जंगलात प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी प्राणीप्रेमींकडून होत असतानाच केरळमध्ये एका ४० वर्षीय हत्तीणीचा प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पाठानमथीटा जिल्ह्यातील शबरीमल देवस्थानाजवळच्या जंगलात मृत अवस्थेत मिळालेल्या या हत्तीणीच्या पोटात दोन किलो प्लॅस्टिक आढळून आले आहे. शबरीमल देवस्थानाच्या जत्रेला आलेल्या भाविकांनी टाकून दिलेल्या प्लॅस्टिक कच-याच्या सेवनामुळे या हत्तीणीचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालात पोटातील प्लॅस्टिकमुळे जवळपास आठवडाभर या हत्तीणीला अन्नसेवन न करता आल्यामुळे तिचा मृत्यू ओढवल्याचे नमूद करण्यात आले असल्याचे पेरीयार पश्चिम विभागाचे उपसंचालक सुनील बाबू यांनी सांगितले. पशुवैद्यकांच्या मते प्लॅस्टिकचा पोटातील आतड्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्याने हत्तीणीचा मृत्यू झाला. यापूर्वी अशी कोणतीही घटना घडली नसली तरी, येथील प्राण्यांच्या विष्ठेत प्लॅस्टिक आढळले आहे. यापुढे जंगल प्लॅस्टिकमुक्त ठेवण्यासाठी कडक पावले उचलण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी वनाधिका-यांनी दिली.