News Flash

प्लास्टिकचा महासागर!

प्लास्टिक हे विघटनशील नसल्याने त्याचा पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होतो, प्लास्टिकचे हे प्रदूषण केवळ भूभागापुरते मर्यादित नसून ते सागरातही मोठय़ा प्रमाणावर आहे असे एका नवीन अभ्यासात

| February 14, 2015 02:07 am

प्लास्टिक हे विघटनशील नसल्याने त्याचा पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होतो, प्लास्टिकचे हे प्रदूषण केवळ भूभागापुरते मर्यादित नसून ते सागरातही मोठय़ा प्रमाणावर आहे असे एका नवीन अभ्यासात दिसून आले आहे. दरवर्षी ८८ लाख टन प्लास्टिक जगातील महासागरांमध्ये येते व त्याचे प्रमाण अंदाजापेक्षा खूपच जास्त निघाले आहे असे सांगण्यात आले. जॉर्जिया विद्यापीठातील पर्यावरण अभियांत्रिकी विभागाच्या प्राध्यापक जेना जॅमबेक यांनी हा संशोधन निबंध सादर केला असून त्यांनी म्हटल्यानुसार सागर किनारी प्रत्येक फुटावर साधारण पाच धान्याची पोती भरतील इतके प्लास्टिक जगातील किनारपट्टीवर आहे. विकसनशील देश हे या प्लास्टिक प्रदूषणास जबाबदार असून प्लास्टिकचा हा भस्मासूर रोखला गेला नाही तर इ.स. २०२५ पर्यंत महासागरांमध्ये १७० दशलक्ष टन प्लास्टिक साठेल असा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

प्लास्टिकच्या वस्तूंची विल्हेवाट लावण्याच्या व्यवस्थापनात हे देश कमी पडत असून त्यामुळे प्लास्टिकचे प्रदूषण वाढत आहे असे त्यांनी म्हटले आहे.
जास्तीत जास्त प्लास्टिक महासागरांमध्ये चीन, इंडोनेशिया, फिलिपिन्स, व्हिएतनाम व श्रीलंका या देशातून वाहात येते. औद्योगिक प्रगत देशात प्लास्टिक प्रदूषणामध्ये अमेरिका तुलनेने आघाडीवर असून त्या देशाचा विसावा क्रमांक आहे. अमेरिका व युरोपात प्लास्टिकचे व्यवस्थापन तुलनेने योग्य प्रकारे केले जाते तरीही थोडय़ा प्रमाणात प्लास्टिक तेथूनही महासागरात जाते. चीन प्लास्टिक प्रदूषणास मोठय़ा प्रमाणात जबाबदार असून तेथून महासागरातील प्लास्टिकच्या २८ टक्के म्हणजे २४ लाख टन प्लास्टिक कचरा येतो. अमेरिकेतून ७७ हजार टन प्लास्टिक महासागरात येते व ते एकूण प्रमाणाच्या १ टक्का आहे. विकसित देशात प्लास्टिकची विल्हेवाट लावणाऱ्या यंत्रणा आहेत त्यामुळे तेथून कमी प्लास्टिक येते असे जॅमबेक यांनी म्हटले आहे. कारा लॅवेंडर लॉ या सहलेखक असून त्यांनी सांगितले की, मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक महासागरात येत असून हा कचरा ही धोक्याची घंटा आहे. महासागर कचरा कार्यक्रमाच्या प्रमुख नॅन्सी वॉलेस यांनी सांगितले की, महासागरातील प्लास्टिक कचरा घातक असून सागरी प्राणी प्लास्टिक खातात. शिवाय त्यामुळे महासागरांमध्ये विष साठत जाते. जॅमबेक यांनी १९२ देशांची जी आकडेवारी जागतिक बँकेकडे आहे त्याच्या आधारे प्लास्टिकच्या कचऱ्याबाबत हे निष्कर्ष काढले आहेत.

महासागरात प्लास्टिक कचरा
*एकूण ८८ लाख टन प्लास्टिक
*२०२५ पर्यंत १७० दशलक्ष टन कचरा साठणार
*चीन, इंडोनेशिया, फिलिपिन्स, श्रीलंका प्रदूषणात पुढे
*चीनमधून २४ लाख टन प्लास्टिक महासागरात
*अमेरिकेतून ७७ हजार टन प्लास्टिक कचरा महासागरात

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 2:07 am

Web Title: plastics dumped in worlds oceans estimated at 8m tonnes annually
Next Stories
1 अ‍ॅमॅझॉन, फ्लिपकार्टची माघार
2 दक्षिण दिल्लीमध्ये ख्रिश्चन शाळेवर अज्ञात व्यक्तींचा हल्ला
3 भारतीयास मारहाणप्रकरणी पोलिसास अटक
Just Now!
X