धर्मपुरी येथे इलावरसन या दलित युवकाचा मृतदेह रेल्वेमार्गात सापडल्याने त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी आणि त्याची पत्नी दिव्या हिला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी शुक्रवारी विशेष उल्लेखाद्वारे मद्रास उच्च न्यायालयात करण्यात आली.
दिव्या हिने याबाबत सदोष मनुष्यवधाची याचिका दाखल केली असून न्या. एम. जयचंद्रन आणि न्या. एम. एम. सुरेश यांच्या खंडपीठापुढे अॅड. वैगैई यांनी विशेष उल्लेखाद्वारे वरील मागणी केली. दरम्यान, इलावरसन याच्या मृतदेहाचे विच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकात त्याच्या पालकांच्या पसंतीच्या डॉक्टरचा समावेश करावा, अशी मागणी अॅड. शंकरासुब्बू यांनी एका याचिकेद्वारे केली आहे.
इलावरसन याने उच्चभ्रू हिंदू मुलीशी विवाह केल्याने गेल्या नोव्हेंबर महिन्यांत धर्मपुरीतील दलितबहुल परिसरात हिंसाचाराचा उद्रेक झाला होता. इलावरसन हा गुरुवारी रेल्वेमार्गात मृतावस्थेत आढळला होता, तर त्याची पत्नी दिव्या हिने इलावरसन याच्यासमवेत नांदण्यास नकार देऊन आपल्या आईसमवेतच राहण्याचा निर्णय जाहीर केला होता.