अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर भाष्य केल्याप्रकरणी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ओवेसी यांनी कोर्टाच्या प्रतिष्ठेला धक्का लावल्याचे आणि अपमान केल्याचे सांगत त्यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच हिंदुंच्या भावना दुखावत मुस्लिमांना भडकावणारं वक्तव्य केल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.

अँटिटेररिस्ट फ्रन्ट इंडिया या संघटनेचे अध्यक्ष विरेश सांडिल्य आणि एका वकिलाने मिळून ओवेसींविरोधात ही याचिका दाखल केली आहे. त्यांनी याचिकेत म्हटलंय की, ओवेसी यांनी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाआधी एका वृत्तवाहिनीवर सुप्रीम कोर्टाची पवित्रता आणि बुद्धिमत्तेबाबत अपमानजनक विधान केलं आहे. कोर्टाने निर्णय सुनावण्यापूर्वी राम मंदिराचा वाद मोठ्या काळापासून प्रलंबित होता. ओवेसींनी या वादाबाबत खोटे आणि निराधार विधान केले आहे. करोडो हिंदुंच्या भावनांचा आदर न करता अशा प्रकारे विधान करीत ते मुस्लिमांच्या भावना भडकावण्याचे काम करीत आहेत. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

३० जुलै रोजी ओवेसी यांनी केलेल्या या विधानामुळे प्रभू श्रीरामामध्ये आस्था असणाऱ्या करोडो भारतीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. राष्ट्रीय वृत्त वाहिनीवर असं विधान करीत त्यांनी सुप्रीम कोर्टाच्याप्रती अनादर व्यक्त केला असून भारताच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नसल्याचेही त्यांनी दाखवून दिले आहे, असेही या याचिकेत म्हटले आहे.