केंद्रीय दक्षता आयुक्त (सीव्हीसी) आणि दक्षता आयुक्त (व्हीसी) यांची प्रतिमा स्वच्छ नसल्याचे कारण देऊन त्यांच्या नियुक्त्यांना आव्हान देणारी याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली.
‘कॉमन कॉज’ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने ही याचिका सादर करण्यात आली आहे. के. व्ही. चौधरी यांची सीव्हीसी म्हणून तर टी. एम. भसीन यांची व्हीसी म्हणून नियुक्ती करताना पूर्णत: पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्यात आला नाही, असे याचिकेत म्हटले आहे.
चौधरी यांची ६ जून रोजी सीव्हीसी म्हणून नियुक्ती करण्यात आली तर भसीन यांनी ११ जून रोजी व्हीसीपदाची सूत्रे स्वीकारली. या नियुक्त्या बेकायदेशीर आणि ऐक्याच्या तत्त्वांचे उल्लंघन करून करण्यात आल्या आहेत, असा आरोप जनहितार्थ याचिकेत करण्यात आला आहे.
या पदांसाठी ज्या उमेदवारांची यादी तयार करण्यात आली होती त्यांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली नाही. इतकेच नव्हे तर चौधरी आणि भसीन यांच्याच नावांचा या पदांसाठी विचार करण्यात आला, असे याचिकेत म्हटले आहे.