उत्तर प्रदेशमधील संबळ येथील एक गँगस्टर अगदी आगळ्यावेगळ्या पद्धतीने पोलिसांना शरण आला आहे. पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या एन्काउंटरसारख्या बेधडक कारवाईची भितीमुळे या कुख्यात गुंडाने गळ्यात पाटी घालून स्वत:ला पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा सर्व प्रकार नरवासा पोलीस स्थानकामध्ये घडला आहे. विशेष म्हणजे या आरोपीवर पोलिसांनी १५ हजार रुपयांचे बक्षीसही ठेवलं होतं.

अमरोहामध्ये राहणारा नईम नावाचा हा गुंड पोलीस स्थानकामध्ये पोहचला आणि थेट पोलिसांच्या पायाच पडू लागला. तो रस्त्यावरुन चालत पोलीस स्थानकात आला तेव्हा त्याने गळ्यामध्ये पाटीही घातली होती. यावर त्याने ‘मला गोळी मारु नका,’ असा मजकूर लिहिला होता. पोलीस स्थानकामध्ये पोहचल्यानंतरही नईम बराच वेळ पोलिसांच्या हातापाया पडत होता. पोलीस त्याला उठून उभं करण्याचा प्रयत्न करत होते मात्र तो रडतच मला माफ करा, माझा जीव घेऊ नका असं म्हणत होता. आपण कोणताही गुन्हा केलेला नाही असंही नईमने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. मला संबळ पोलिसांची भरपूर भीती वाटत आहे. ते मला कोणत्याही प्रकरणामध्ये अडकवू शकतील म्हणून मी पोलिसांना शरण आलो आहे, असंही नईम म्हणाले.  यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

नईम पोलीस स्थानकात पोहचल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. संबळमधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून मागील काही काळामध्ये कुख्यात गुडांचा एन्काउंटर करण्यात आला आहे. त्यामुळेच आता गुन्हेगारांमध्ये पोलिसांबद्दलची भीती वाढली आहे. याच भीतीमुळे नईमनेही घाबरुन शरण येण्याचा निर्णय घेतला आहे.


मागील काही काळापासून पोलिसांनी गुन्हेगारांची आर्थिक नाकेबंदी करण्यासही सुरुवात केली आहे. याच कारवाईअंतर्गत पोलिसांना कुख्यात गुंड इस्लाखची २५ कोटींची संपत्ती जप्त केली. मुजफ्फरनगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अभिषेक यादव यांनी रविवारी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार इम्लाख हा पोलिसांवर हल्ला करण्यापासून ते अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे.