योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यात मुलायमसिंह यादव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानात काय पुटपुटले हे अखेर समोर आले. ‘अखिलेशला सांभाळून घ्या, त्यालाही थोडं शिकवा’ असे मुलायमसिंह यांनी मोदींना सांगितले. मोदींनीही मनाचा मोठेपणा दाखवत मुलायमसिंह यांना मान हलवत होकार दिला.

उत्तरप्रदेशमध्ये बहुमताने सत्तेत येणाऱ्या भाजपने योगी आदित्याथ यांना मुख्यमंत्रीपदावर संधी दिली आहे. रविवारी लखनौमध्ये आदित्यनाथ यांचा थाटामाटात शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आदी भाजपचे नेते उपस्थित होते. पण या सोहळ्यात मुलायमसिंह यादव आणि त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांची उपस्थिती सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी ठरली. मुलायमसिंह आणि अखिलेश यांनी मंचावर जाऊन मोदी आणि अन्य नेत्यांचे अभिनंदन केले. या दरम्यान मुलायमसिंह हे मोदींच्या कानात पुटपुटताना दिसले होते. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची सर्वत्र उत्सुकता होती. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमका काय संवाद झाला हे भाजपच्याच एका नेत्याने उघड केले आहे.

मुलायमसिंह आणि मोदींच्या भेटीदरम्यान संबंधीत नेता मंचावरच उपस्थित होता. मुलायमसिंह यांच्या बोलण्यातून एका पित्याची मुलाविषयीची तळमळ दिसून आली. मुलायमसिंह मोदींच्या जवळ जाऊन म्हणाले, अखिलेशला सांभाळून घ्या. यानंतर अखिलेश जेव्हा मोदींशी हस्तांदोलन करत होते त्यावेळी मुलायमसिंह म्हणाले, त्याला थोडं शिकवा. मोदींनीही मुलायमसिंह यांना होकार दिला.

उत्तरप्रदेशमध्ये सत्तेवर असणाऱ्या समाजवादी पक्षाची यंदाच्या निवडणुकीत दयनीय अवस्था झाली. काँग्रेससोबत आघाडी केल्याचा समाजवादी पक्षाला फटका बसला अशी चर्चा सुरु झाली आहे. समाजवादी पक्षात मुलायमसिंह आणि अखिलेश या पितापुत्रांमध्ये संघर्ष झाला होता. शेवटी मुलायमसिंह यांनी प्रचारापासून लांब राहणे पसंत केले होते. काँग्रेससोबत आघाडी करण्यास मुलायमसिंहाचा विरोध होता. पण अखिलेश यादव यांनी विरोधानंतरही आघाडी केली होती. दारुण पराभव झाल्यानंतरही मुलायमसिंह आणि अखिलेश यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहून खेलाडूवृत्तीचे दर्शन घडवले आहे.