देशात सध्या मुस्लिम हा शब्द एखादा गलिच्छ शब्द असल्याने वापरला जातो आहे. काँग्रेस काय किंवा भाजपा काय दोन्ही पक्षांना मुस्लिमांच्या प्रगतीशी काहीही देणेघेणे नाही. भाजपाला पुन्हा देशाची फाळणी घडवून आणायची आहे का? असा प्रश्न उपस्थित करत एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपावर आणि त्याचप्रमाणे काँग्रेसवरही निशाणा साधला. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून किती मुस्लिम तरूणांना देशाच्या लष्करात नोकरीची संधी मिळाली? रेल्वेमध्ये किती मुस्लिम तरूणांना नोकरी मिळाली असे प्रश्न उपस्थित केले.

मुस्लिम तरूणाच्या एका हातात कुराण आणि एका हातात संगणक असलेला मला बघायचा आहे. मी ही गोष्ट प्रत्यक्ष कृतीत आणून दाखवेन असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केला होता. प्रत्यक्षात त्यांना या आश्वासनाचा सपशेल विसर पडला आहे असेही ओवेसी यांनी म्हटले आहे. सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे मुस्लिम शब्द हा एखाद्या शिवीप्रमाणे किंवा एखाद्या गलिच्छ शब्दाप्रमाणे सध्या देशात वापरला जातो आहे.

काँग्रेस काय आणि भाजपा काय दोन्ही पक्षांनी मुस्लिम या शब्दाचा अपमान केला आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रियांवरून देशातील मुस्लिम तरूणांना काय संदेश द्यायचा आहे असेही प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केले आहेत. मुस्लिम तरूणांना नोकरी मिळेल त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मी सोडवेन अशी अनेक आश्वासने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती. मात्र ती चार वर्षांपूर्वी दिली असल्याने त्यांच्या ती स्मरणात नसावीत असेही ओवेसी यांनी म्हटले आहे. तसेच भाजपाने सत्तेवर आल्यापासून मुस्लिम समाजाच्या विकासासाठी काय केले? असा प्रश्नच ओवेसी यांनी उपस्थित केला.