नासाच्या न्यू होरायझन्स या प्लूटोच्या भेटीस गेलेल्या अवकाशयानाने त्या ग्रहाची अखेरची प्रदक्षिणा केली असून आता ते अनंताच्या प्रवासाला निघून जाईल, हे खरे असले तरी या यानावरून एक दूरध्वनी करण्यात आला होता तो तीन अब्ज मैलांवरून अखेर पृथ्वीवर पोहोचला व मोहीम फत्ते झाल्याचे पृथ्वीवरील वैज्ञानिकांना समजले. २१ तासांनी हे गूढ अवकाशयानाने वैज्ञानिकांना या दूरध्वनीच्या मदतीने सांगितले. प्लूटोच्या या मोहिमेत मिळालेली माहिती पृथ्वीकडे पाठवण्यास यानाला १६ महिने लागतील यावरून किती मोठय़ा प्रमाणात माहिती मिळाली असेल याचा अंदाज यावा असे नासाने म्हटले आहे.
न्यू होरायझन्स या अवकाश यानातून रात्री फोन करण्यात आला. त्यात मोहिमेतील चमूला सर्व काही आलबेल असल्याचे सांगण्यात आले. प्लूटोच्या जवळून न्यू होरायझन्सचा हा प्रवास स्तिमित करणारा होता असे नासाने म्हटले आहे. प्रत्यक्ष प्लूटो ग्रहाजवळ गेल्यानंतर १३ तासांनी मोहीम पूर्ण झाली. नंतर अवकाशयानाने संदेश पाठवणे थांबवले व त्यापूर्वी अँटेनाच्या मदतीने बटू ग्रहाची माहिती घेण्यात आली. पृथ्वीवर पाठवण्यात आलेल्या संदेशानुसार मोहिमेतील उद्दिष्टे सफल झाली असून आता बरीच माहिती छायाचित्रांच्या माध्यमातून हाती येईल. न्यू होरायझन्सच्या नियंत्रण कक्षात नंतर यानाने पुन्हा संपर्क प्रस्थापित केला, तेव्हा वैज्ञानिकांनी एकच जल्लोष केला. आम्ही नव्या पिढीला एका मोठय़ा यशाने प्रेरणा दिली असून आणखी नवीन शोधांना चालना दिली आहे, असे नासाचे प्रशासनक चार्लस बोल्डन यांनी सांगितले, हा ऐतिहासिक विजय असून आम्ही मानवी क्षमतांची सीमारेषा उंचावली आहे, असे त्यांनी सांगितले.
नऊ वर्षांनी तीन अब्ज मैलांचे अंतर तोडून न्यू होरायझन्स यानाने १२,५०० कि.मी. अंतरावरून बटू ग्रह प्लूटोला गवसणी घातली.
आधीच प्रोग्रॅमिंग केलेला एक फोन कॉल यानात ठेवण्यात आला होता. यान तेथे गेल्यानंतर तो फोन कॉल कार्यान्वित होणार होता. त्याप्रमाणे मेरीलँड येथे हॉपकिन्स विद्यापीठाच्या उपयोजित भौतिकशास्त्र प्रयोगशाळेत हा दूरध्वनी आला व नासाच्या डीप स्पेस नेटवर्कने तो टिपला. २१ तासांच्या प्रदीर्घ उत्कंठेनंतर हा फोन येताच सगळ्यांचा जीव भांडय़ात पडला.