श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेला ४५ कोटी डॉलर्सच कर्ज देण्याचा निर्णय जाहीर केला. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी कर्जाद्वारे आर्थिक मदतीचा हा निर्णय घेतला आहे.

४५ कोटी डॉलर्समध्ये दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी पाच कोटी डॉलर्सचा समावेश आहे. गोताबाया राजपक्षे आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये समाधानकारक चर्चा झाली. राजपक्षे भारत दौऱ्यावर आले आहेत. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा राजपक्षे यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे.

श्रीलंकेतील तामिळ जनतेच्या विषयासह सुरक्षा, व्यापार आणि मच्छीमारांच्या मुद्यावर या बैठकीत चर्चा झाली. विकासाच्या मार्गावर श्रीलंकेला पूर्ण सहकार्य करण्याचे मोदींनी आश्वासन दिले आहे. श्रीलंकेतील विविध विकास प्रकल्पांसाठी ४० कोटी डॉलर्स तर दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी पाच कोटी डॉलर्स देण्यात येणार आहेत.

संयुक्त पत्रकारपरिषदेत श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या भारतीय बोटींची मुक्तता केली जाणार असल्याचे घोषणा केली. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारत सर्वप्रकारे दहशतवादाचा विरोध करत आहे व दहशतवादाविरोधातील आमची लढाई सुरूच राहील. या लढाईत भारत श्रीलंकेला साथ देत राहील, असे सांगितले.

याप्रसंगी श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी हे देखील सांगितले की, दहशतवादाविरोधातील लढाईत आम्हाला भारताची साथ मिळालेली आहे. आम्हीपण सर्वच मुद्यांवर भारताबरोबर आहोत. भारताबरोबचे आमचे संबंध अत्यंत महत्वपूर्ण आहेत. भारतीय उपखंडात शांतता रहावी यासाठी सुरक्षेच्या मुद्यावर भारताबरोबर आम्ही काम करणार आहोत. तसेच, द्विपक्षीय बैठकीत मच्छिमारांबाबतही बरीच चर्चा झाली. मासेमारी करताना अनेकदा मच्छिमार भटकत श्रीलंकेच्या हद्दीत पोहचतात, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.