News Flash

पंतप्रधान निधीतून भंडारा दुर्घटनेतील पीडित कुटुंबांना दोन लाखांची मदत जाहीर

आगीत गंभीर जखमी झालेल्यांना ५०,००० रुपयांची मदत देणार

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय दुर्घटनाप्रकरणी पीडित कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. तर या घटनेत जे गंभीररित्या जखमी झाले आहेत त्यांना ५०,००० रुपयांची मदत देण्यात येणार आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून ही मदत दिली जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षात शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास आग लागल्याने दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता. तेथील १७ नवजात बालकांपैकी सात बालकांना वाचवण्यात यश आले. मृत बालके एक ते तीन महिने वयाची होती. त्यांत आठ मुली आणि दोन मुलगे असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. रुग्णालय परिसरात मृत बालकांच्या माता टाहो फोडत होत्या. त्यांच्या आक्रोशाचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता कक्षात ‘आऊटबॉर्न’ आणि ‘इनबॉर्न’ असे दोन कक्ष आहेत. सर्व मृत बालके ‘आऊटबॉर्न’मधील आहेत. त्यातील दोघांचा होरपळून, तर आठ बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला.

आणखी वाचा- भंडाऱ्यातील रुग्णालयाला ३० ते ४५ मिनिटांपूर्वी आग लागली!

या दुर्घटनेमुळे राज्यासह अवघा देश हळहळला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेबाबत शोकसंवेदना व्यक्त केल्या होत्या.

आणखी वाचा- “थोडं राजकारण कमी करा आणि नेहरूंनी केलं तसं काम करा”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली पाच लाखांची मदत जाहीर

भंडाराची दुर्घटना समोर येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीचा तातडीचा आढावा घेतला आणि मृत बालकांच्या पालकांना पाच लाखांची मदत जाहीर केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी प्रत्यक्ष दुर्घटना घडलेल्या रुग्णालयाला आणि पीडित कुटुंबांना भेट दिली. यावेळी आपल्याकडे सांत्वनासाठी शब्दही नव्हते, केवळ हात जोडून त्यांचे सांत्वन केले, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 2:41 pm

Web Title: pm announces rs 2 lakh aid to bhandara tragedy victims aau 85
Next Stories
1 देशात करोनाच्या नव्या स्ट्रेनचा संसर्ग झालेल्यांची संख्या पोहोचली ९६ वर – आरोग्य मंत्रालय
2 आंदोलनातून मोठ्याप्रमाणावर शेतकरी निघून गेले आहेत, कारण… – फडणवीस
3 … नाहीतर आम्हीच कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देऊ; सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला घेतलं फैलावर
Just Now!
X