09 March 2021

News Flash

भारतात उद्योगस्नेही वातावरण

परदेशी कंपन्यांना गुंतवणुकीचे पंतप्रधानांकडून आवाहन

संग्रहित छायाचित्र

 

भारत ही आशियातील तिसरी मोठी आणि खुली अर्थव्यवस्था असून आमच्याकडे उद्योगस्नेही, स्पर्धात्मक व संधींनी परिपूर्ण असे वातावरण आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत करोनाकाळातील टाळेबंदीनंतर आता पुन्हा हिरवी पालवी दिसत असून परिस्थिती सुधारण्याच्या मार्गावर आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ‘ग्लोबल वीक २०२०’ या कार्यक्रमात त्यांनी जगातील कंपन्यांना गुंतवणुकीकरिता भारतात येण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचे सूचित केले.

ते म्हणाले, की सर्व जागतिक कंपन्यांचे आमच्याकडे स्वागतच आहे. आमची अर्थव्यवस्था जगातील जास्तीतजास्त खुल्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. भारतात ज्या संधी उद्योगांना आहेत त्या क्वचितच इतरत्र दिसून येतील. अलीकडच्या काळात कृषी, अवकाश व संरक्षण क्षेत्रात केलेल्या सुधारणांचा लेखाजोखा त्यांनी मांडला. जागतिक भांडवलाला भारताकडे वळवण्यासाठी त्यांनी परदेशी कंपन्यांना आवाहन केले.

आम्ही अर्थव्यवस्था जास्त उत्पादक, गुंतवणूकस्नेही व स्पर्धात्मक करीत आहोत. भारतात अनेक शक्यता व संधी उपलब्ध आहेत. कृषी क्षेत्रातील सुधारणांमुळे साठवणूक व रसद पुरवठा क्षेत्रात गुंतवणुकीला संधी आहेत. कंपन्यांना आम्ही थेट गुंतवणुकीची संधी दिली आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातही सुधारणा करण्यात आल्या असून त्या मोठय़ा उद्योगांना पूरक आहेत. संरक्षण उत्पादनाचे क्षेत्र खासगी कंपन्यांना खुले करण्यात आले असून त्यात सुटय़ा भागांची निर्मिती या कंपन्या करू शकतील. यातही गुंतवणुकीला संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

करोना साथीनंतर जागतिक पातळीवर आर्थिक पुनरुज्जीवन हे भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्याशी निगडित आहे. भारतीय लोकांमध्ये अशक्य ते शक्य करून दाखवण्याची जिद्द आहे. त्यामुळेच आर्थिक आघाडी सुरळीत होण्याचा विचार करता भारतीय अर्थव्यवस्थेत आता हिरवी पालवी दिसत आहे. आम्ही जेव्हा आर्थिक पुनरुत्थानाचा विचार करतो तेव्हा त्यात पर्यावरण व अर्थव्यवस्थेची शाश्वतता, काळजी, सहवेदना या पैलूंचाही समावेश आहे. एकीकडे लोकांच्या आरोग्यावर भर देताना अर्थव्यवस्थेच्या आरोग्याकडे तेवढेच बारकाईने लक्ष देत आहोत. आर्थिक सर्वसमावेशकता, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा, उद्योग सुलभता, जीएसटीसारख्या कर सुधारणा यात भारताने सहा वर्षांत मोठी कामगिरी केली आहे.

करोनाकाळात लोकांना मोफत शिधा, स्वयंपाकाचा गॅस व गरिबांना रोख रक्कम देण्याच्या सरकारच्या पॅकेजचा उल्लेख करून त्यांनी सांगितले, की आम्ही लोकांना मोठय़ा प्रमाणात मदत केली असून रचनात्मक सुधारणा केल्या आहेत. आमच्या मदत योजना या गरिबांसाठी असून त्यात सर्व पैसा लाभार्थीना थेट मिळण्यात तंत्रज्ञानाची मोठी मदत झाली आहे.

आत्मनिर्भरता जगाशी नाते तोडण्यासाठी नव्हे – मोदी

‘आत्मनिर्भर भारत’ म्हणजे जगाशी नाते तोडणारा भारत किंवा आत्मसंतुष्ट, संकुचित भारत नव्हे. स्वशाश्वत व स्वनिर्मितीक्षम भारत असा आहे. जेव्हा टाळेबंदी उठवण्यात आली तेव्हा सरकारने जगातील सर्वात मोठे सार्वजनिक बांधकाम कार्यक्रम रोजगारासाठी सुरू केले. त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त होईल. करोना साथीने भारत औषध उद्योगात आघाडीवर असल्याचे दाखवून दिले आहे. औषधांच्या किमती कमी करण्यात भारताचे योगदान मोठे असून विकसनशील देशांना परवडणारी औषधे आम्ही तयार केली आहेत, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 12:09 am

Web Title: pm appeals to foreign companies to invest abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 शिक्षणात राजकारण नको; रमेश पोखरियाल यांचे आवाहन 
2 अहमद पटेल यांची चौथ्यांदा चौकशी
3 सिप्लाच्या रेमडेसिविरची किंमत केवळ चार हजार रुपये
Just Now!
X