पंतप्रधान नरेंद्र मोदी टीव्हीवर बोलतात, पॉप कॉन्सर्टला बोलतात, मग ते संसदेत का बोलत नाहीत, असा रोकडा सवाल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थित केला. ते मंगळवारी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तत्पूर्वी आज दिल्लीत झालेल्या भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत बोलताना भावूक झाले. नोटाबंदीच्या निर्णयाला काळ्या पैशांविरोधातील सर्जिकल स्ट्राइक म्हणू नका, असे यावेळी मोदींनी म्हटले. मोदी यांच्या भावूक होण्यावरही राहुल यांनी भाष्य केले. नोटाबंदीच्या मुद्द्यावर आम्ही बोलल्यानंतर मोदी आणखी भावूक होतील, असे राहुल यांनी म्हटले. यापूर्वी गोव्यातील जाहीर भाषणातही देशासाठी घरादाराचा त्याग केला, हे सांगतानाही मोदी भावनाविवश झाले होते. दरम्यान, राहुल यांनी आज पुन्हा एकदा नोटाबंदीच्या निर्णयावरून नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. मोदी सरकारने ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे सध्या देशभरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी संसदेत येऊन या मुद्द्याविषयी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प होताना दिसत आहे.

‘भाषणादरम्यान भावूक होणे ही तर मोदींची नौटंकी’ 

दरम्यान, राहुल गांधी यांनी यापूर्वीही सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर कडाडून टीका केली होती. नोटबंदीचा निर्णय घेऊन मोदी सरकार सामान्य जनतेच्या खिशातील पैसा काढून घेत आहे. नरेंद्र मोदी हा पैसा उद्योगपतींच्या घशात घालणार आहेत, असा घणाघाती आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. मोदी सरकार हे केवळ काही उद्योगपतींच्या हितासाठी काम करत आहे. गेल्या वर्षभरात सरकारने १५ उद्योगपतींची मिळून १ लाख १० हजार कोटींची कर्जे माफ केली आहेत. त्यामुळे आता ही तूट भरून काढण्यासाठी सामान्यांच्या खिशातून बँकेत आलेल्या पैशांचा वापर केला जाईल, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. नोटबंदीच्या निर्णयामागे देशातील काळ्या पैशाला चाप लावण्याचे कारण सरकारकडून सांगितले जाते. मात्र, सध्या देशभरात बँकेसमोर लागणाऱ्या रांगेत श्रीमंत व्यक्ती दिसतात का, असा सवाल राहुल यांनी विचारला. काळ्या पैशांविरुद्ध खरोखरच कारवाई करायची असेल तर प्रथम नरेंद्र मोदी ज्यांच्या खासगी विमानाने प्रवास करतात, त्यांच्याविरुद्ध कारवाई करा. काँग्रेस या सगळ्याविरुद्ध लढा देत असून काही झाले तरी या लढाईतून आम्ही एक इंचही मागे हटणार नाही, असे राहुल यांनी सांगितले होते.