ऑस्ट्रेलियात भारतीय संघानं मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा हवाला देत मोदी यांनी विद्यार्थांना आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आज शुक्रवारी सकाळी आसाममधील तेजपूर विद्यापीठाच्या १८ व्या दीक्षांत समारंभाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते. आसामचे राज्यपाल जगदीश मुखी, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल आणि आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यावेळी उपस्थित होते. दीक्षांत समारोहात एकूण १,२१८ विद्यार्थ्यांनी पदवी आणि पदविका प्राप्त केली.

विद्यार्थांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, अननुभवी आणि दुखापतग्रस्त असेलेल्या संघानं न खचता निर्धार आणि ध्येयानं जगातील सर्वोत्तम संघाचा त्यांच्याच देशात पराभव केला. एकप्रकारे टीम इंडियानं सर्वांना आत्मनिर्भरतेचा धडा शिकवला आहे. आपण सर्वांनी त्यांच्याकडून या गोष्टी शिकायला हव्यात, असं मोदी म्हणाले.

आणखी वाचा- “ते 36 वर आउट झाले होते…आपण 44 वर…टीम इंडियाच्या विजयात लपलाय काँग्रेससाठी संदेश”

ते म्हणाले की, आता आपण ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आताचे पदवी घेणारे विद्यार्थी भविष्यात देशाचा १०० वा स्वातंत्र्य दिन साजरा करतील. याकालावधीत विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर भारत घडविण्याच्या दिशेने काम केले पाहिजे. भविष्यातील विद्यापीठे पूर्णपणे आभासी असतील आणि जगाच्या कुठल्याही भागातील विद्यार्थी कधीही कुठेही अभ्यास करू शकतील. अशा प्रकारच्या परिवर्तनासाठी नियामक चौकट असणे आवश्यक आहे आणि आम्ही नवीन शैक्षणिक धोरणाद्वारे हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहोत.