पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी निवडणुकीतील यशाबद्दल नवाझ शरीफ यांचे अभिनंदन करीत त्यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले आहे. पाकिस्तानातील मतमोजणी सुरू असतानाच पंतप्रधान डॉ. सिंग यांनी शरीफ यांचे अभिनंदन करीत पाकिस्तानसह मैत्रीसाठी भारत उत्सुक असल्याचे संकेत दिले आहेत.
पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग या पक्षाने सर्वाधिक जागांवर आघाडी मिळवली आहे. आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान शरीफ यांनी भारताला भेट देण्याची मनीषा व्यक्त केली होती. तसेच उभयदेशांदरम्यान शांतता चर्चेस सुरुवात व्हावी, असे सुचविले होते.
या पाश्र्वभूमीवर भारतीय पंतप्रधानांतर्फे शरीफ यांचे निवडणुकीतील यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले. दहशतीच्या व हिंसाचाराच्या छायेत पाकिस्तानी जनतेने निवडणुकांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल डॉ. सिंग यांनी पाक जनतेच्या धैर्याचे कौतुक केले.
दरम्यान, पाकिस्तानात लोकशाही मार्गाने निवडणुका झाल्या ही आनंदाची बाब असून या निवडणुकांचे येणारे निकाल, मग ते कसेही असोत ते स्वागतार्ह आहेत, असे खुर्शीद यांनी सांगितले. नवाझ शरीफ यांच्याशी भारताचे चांगले संबंध असल्याचे नमूद करीत, ते सत्तेवर आल्यास भारत- पाक मैत्रीला चालना मिळेल, असा विश्वासही खुर्शीद यांनी व्यक्त केला.