पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कोणाकडूनही प्रमाणपत्राची गरज नसल्याचे सांगत केंद्रीय कोळसा मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी गुरुवारी त्यांची पाठराखण केली. 
कोळसा खाणवाटप घोटाळ्यात डॉ. सिंग यांच्यावरही कारस्थान रचल्याचा आरोप ठेवावा, अशी मागणी माजी कोळसा सचिव पी.सी. पारख यांनी केली होती. त्यानंतर प्रमुख विरोधी पक्ष भाजपने पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर जयस्वाल यांनी पंतप्रधानांची पाठराखण केली.
ते म्हणाले. पंतप्रधानांचा प्रामाणिकपणा आणि निष्ठा याबद्दल संपूर्ण देशाला माहिती आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना कोणाकडूनही प्रमाणपत्र मिळवण्याची गरज नाही. अधिकाऱयांना काम करण्यापासून परावृत्त करतील, अशी वक्तव्ये कोणीही करू नयेत, असेही त्यांनी कोणाचे नाव न घेता सांगितले.