३० नोव्हेंबरपर्यंत गरीबांना धान्य मोफत दिलं जाणार आहे अशी अत्यंत महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. याचा लाभ देशातल्या ८० कोटी जनतेला होणार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनाही लवकरच लागू केली जाणार आहे अशीही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. जे करदाते आहेत त्यांना मी अभिवादन करतो त्यांनी प्रामाणिकपणे त्यांचा कर भरला त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो असंही मोदींनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अनलॉक २ ची घोषणा

मागील तीन महिन्यात आपण गरीबांना मोफत अन्न धान्य दिलं. पाच किलो गहू किंवा तांदूळ, एक किलो डाळ आणि एक किलो चणे असं धान्य मोफत दिलं. अशाच प्रकारे नोव्हेंबरच्या शेवटापर्यंत आपण गरीबांना धान्य मोफत देणार आहोत अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या योजनेचा लाभ देशातल्या ८० कोटी लोकांना घेता येईल असंही त्यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- सरपंच असो किंवा पंतप्रधान नियमांपेक्षा कोणीही मोठा नाही – नरेंद्र मोदी

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिलं जातं आहे. ही योजना जुलै ते नोव्हेंबर या काळातही सुरु राहणार आहे. पाच किलो गहू किंवा तांदूळ, एक किलो चणाही मोफत दिला जाईल. यासाठी ९० हजार कोटींपेक्षा जास्त खर्च होणार आहे. मागील तीन महिन्यांचा खर्च जोडला तर ही रक्कम दीड लाख कोटीच्या घरात जाते. संपूर्ण भारतासाठी आपण एक स्वप्न पाहिलं होतं… अनेक राज्यांनी करोना काळात चांगलं काम केलं आहे. त्यांना आपण आवाहन करतो आहोत की वन नेशन वन रेशन कार्ड योजनेसाठीही त्यांनी सहकार्य करावं. याचा लाभ त्या गरीबांना मिळेल जे रोजगारासाठी आपलं गाव सोडून इतर राज्यांमध्ये जातात. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- अनलॉक १ पासून लोकांमध्ये निष्काळजीपणा वाढला : पंतप्रधान

आज गरीबांना सरकार जर मोफत धान्य देऊ शकत असेल तर त्याचं श्रेय दोन वर्गांना जातं एक तर धान्य पिकवणारा शेतकरी आणि दुसरा घटक म्हणजे आपल्या देशाचे इमानदार करदाते. तुमचे परिश्रम आणि प्रयत्न यामुळेच देश गरीबांना ही मदत करु शकतो आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.