सर्वपक्षीय शिष्टमंडळ मनमोहन सिंग यांना भेटले
अतिवृष्टीमुळे विदर्भात झालेल्या हानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे दोन पथके पाठविण्यात येणार आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विदर्भाला मदत करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचे बुधवारी सांगितले.
विदर्भाच्या लोकप्रतिनिधींच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पंतप्रधान मनमोहन सिंग आणि कृषी मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीकडे त्यांचे लक्ष वेधले. विदर्भाला केंद्राकडून मदत देण्यासाठी पवार यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती निर्णय घेईल, असे पंतप्रधानांनी या शिष्टमंडळाला सांगितले. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल, खासदार मुकुल वासनिक, विलास मुत्तेमवार, दत्ता मेघे, मारोतराव कोवासे, विजय दर्डा, प्रतापराव जाधव, संजय धोत्रे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, राज्याचे रोजगार हमी व जलसंधारण मंत्री नितीन राऊत, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या शिष्टमंडळाने मनमोहन सिंग आणि पवार यांना भेटून अतिवृष्टीग्रस्त विदर्भाला मदत करण्याची मागणी केली.