पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांसोबत मॅरेथॉन बैठक घेतली. यावेळी मोदींनी विकासाचा स्पष्ट दृष्टीकोण असूनही, अंमलबजावणीत का कमी पडत आहेत, यासंदर्भात सचिवांना प्रश्न विचारल्याचे सूत्रांनी सांगितले. केंद्रीय मंत्रिमंडळातील मोठ्या फेरबदलानंतर बऱ्याच महिन्यांनी घेण्यात आलेली ही बैठक चार तासांपेक्षा जास्त काळ चालली. या बैठकीत सचिवांनी विविध धोरण-संबंधीत बाबींवर आपले विचार मांडले. तसेच शासनातील आणि धोरणांच्या अंमलबजावणी संदर्भात सूचना केल्या, असे सूत्रांनी सांगितले.

सचिवांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मोदी म्हणाले की, “तुम्हा सर्वांचा दृष्टीकोन कौतुकास्पद आहे. परंतु यावर अंमलबजावणी का होत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. एखाद्या विभागाच्या सचिवासारखे वागण्याऐवजी त्यांनी आपापल्या कार्यसंघाच्या नेत्याप्रमाणे वागले पाहिजे,” असा सल्लाही पंतप्रधान मोदी यांनी दिला.

एका सचिवांनी सुचवले की, नवीन ड्रोन नियमावलीच्या दृष्टीने आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आपण आपला शिक्षण आणि कौशल्य कार्यक्रम संरेखित केला पाहिजे. जेणेकरून इकोसिस्टम विकसित होऊ शकेल. या कल्पनेचे कौतुक करताना, मोदींनी इतर अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागांच्या मागण्यांबद्दल विचार करण्यास सांगितले. तसेच कृषी संशोधन करणारा विभाग इतर विभागांच्या गरजेनुसार त्याचे संशोधन कार्यक्रम आखू शकतो, असंही ते म्हणाले.

करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर, पंतप्रधान मोदी सरकार आणि अधिकाऱ्यांमध्ये नवीन ऊर्जा आणि उत्साह आणण्यासाठी मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विचारमंथन सत्र घेत आहेत, त्याचाच एक भाग म्हणून ही बैठक घेण्यात आली.