पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून (पीएमओ) शेतकरी आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केला आहे. एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीवरील मुलाखती दरम्यान त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे.

कोणत्याही कायद्यात सुधारणा केली जाऊ शकते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत स्पष्ट केलं आहे. तसेच शेतकऱ्यांना आंदोलन संपवून घरी परतण्याचं आवाहनही त्यांनी केलं. मात्र, तरीही तुम्ही आंदोलन स्थगित का करत नाहीत? या प्रश्नावर उत्तर देताना टिकैत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींना चुकीची माहिती असणारी कागदपत्रं दिली जात आहेत. पीएमओतील अधिकारीच हे उद्योग करत आहेत. सहारनपूर येथे ऊसाच्या नुकसानीची भरपाई सरकार करणार असल्याचं त्यांच्याकडून वदवून घेण्यात आलं”

आणखी वाचा- लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी दीप सिद्धूला अटक; १४ दिवसांपासून होता फरार

पंतप्रधान मोदी हे देशाचे आहेत कोणत्या पक्षाचे नाहीत, त्यामुळे सरकारने आमच्या समितीशी चर्चा करावी. आमच्या समितीमध्ये चाळीस लोक आहेत. आम्ही कोर्टाच्या आदेशाचा सन्मान केला आहे. आम्ही संसदेचा सन्मान करतो मात्र आंदोलन करणं आमचा अधिकार आहे,” असंही टिकैत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, २६ जानेवारी रोजी शेतकरी आंदोलन संपत असल्याचं दिसू लागलं होतं. गाझिपूर बॉर्डरवर माध्यमांशी बोलताना आपण भावूकही झाला होतात. या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, “जेव्हा ३-४ लाख ट्रॅक्टर परत गेले तर अफवा पसरवली गेली की शेतकरी आंदोलन आता संपत आलं आहे. मात्र, पोलिसांनी लाठ्या चालवल्याने फरक पडत नाही. शेतकऱ्यांच्या मागे गुंड, पोलीस त्यानंतर बॅऱिकेटिंगही होतं. गुंडांकडून आंदोलन संपवण्याचा कट रचला गेला होता का? असा सवालही त्यांनी केला.” अश्रूंबाबत बोलताना टिकैत म्हणाले, “ते माझे नाही तर शेतकऱ्यांचे अश्रू होते. अत्याचार कदापि सहन केला जाणार नाही”