मद्यसम्राट आणि कर्जबुडव्या विजय मल्ल्या देश सोडून जाण्यापूर्वी अर्थमंत्री अरूण जेटलींना भेटला होता. ही बाब अत्यंत धक्कादायक आहे अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. विजय मल्ल्या जेटलींना भेटला होता तर नीरव मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटला होता असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. या मुलाखतींमध्ये काय बोलणे झाले? हे स्पष्ट झाले पाहिजे असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.

मी देश सोडण्यापूर्वी अर्थमंत्री अरूण जेटलींना भेटलो होतो असे कर्जबुडव्या विजय मल्ल्याने सांगितले. ज्यानंतर अरूण जेटली यांच्याविरोधात टीकेचा भडीमार सुरू झाला. काँग्रेसने तर अशीही टीका केली की मल्ल्या पळून जाणार हे जेटलींना माहित होते. मात्र अरूण जेटली यांनी विजय मल्ल्या खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे. अशात आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही जेटली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

मी विजय मल्ल्याला भेटलो नाही हा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा दावा खोटा आहे. देश सोडून जाण्याच्या दोन दिवस आधी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये अरुण जेटली आणि विजय मल्ल्या यांच्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटे चर्चा झाली होती असा आरोप काँग्रेसने केला आहे.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन अरुण जेटली खोटे बोलत असल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांच्यासोबतच आता अरविंद केजरीवाल यांनीही जेटली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.