लोकशाही शासनप्रणाली, लोकसंख्येची विभागणी आणि ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील असणे ही भारताची बलस्थाने आहेत. त्यातच भारतात असलेल्या बाजारपेठेमुळे भारताला जगभरात वाढती मागणी आहे. आणि म्हणूनच २१ व्या शतकातील जगाचे नेतृत्त्व भारत करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केला. अमेरिकेतील ‘मॅडिसन स्क्वेअर’वर सुमारे २० हजार अनिवासी भारतीयांसमोर पंतप्रधानांनी तासभर उत्स्फूर्त भाषण केले. ‘नरेंद्र मोदी जिंदाबाद’, ‘मोदी..मोदी..मोदी.’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी यावेळी आसमंत दुमदुमला. ‘मॅडिसन स्क्वेअर’वर इतका उदंड प्रतिसाद मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
आपल्या साद घालण्याच्या शैलीत भाषणाची सुरुवात करताना मोदी यांनी तरुणाईचे लक्ष वेधून घेतले. तुमची मान शरमेनं खाली जाईल अशी कोणतीही गोष्ट माझ्या सरकारकडून होणार नाही, असे आश्वासन मोदी यांनी दिले. विकासाची प्रक्रिया यशस्वी केव्हा होते, असा सवाल करीत ‘विकास ही जनतेची चळवळ करायचा माझ्या सरकारचा प्रयत्न आहे, मग आम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी कसे ठरू,’ असा सवाल मोदी यांनी केला. रविवारी मॅडिसन स्क्वेअर येथे भाषण करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बीटल्स’चे एल्व्हिस प्रेसली, पॉपस्टार मायकेल जॅकसन आणि मॅडोना यांच्या पंक्तीत स्थान मिळवले.
वातावरण मोदीमय..
अंगात नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे असलेले टी शर्ट, हातात भारत-अमेरिका मैत्रीचे फलक आणि नरेंद्र मोदी यांच्या जयजयकाराच्या घोषणा यांनी अमेरिकेतील मॅडिसन स्क्वेअरचे वातावरण भारले होते. सुमारे २० हजार भारतीय नागरिकांच्या गर्दीसमोर भारतीय पंतप्रधानांनी आपले विचार मांडले. मॅडिसन स्क्वेअरमधील हा आजवरचा सर्वात मोठ्ठा कार्यक्रम ठरल्याचे म्हटले जात आहे.