देशामध्ये करोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच पहिल्या फळीतील करोना योद्ध्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्याच्या अंमलबजावणीला १६ जानेवारीपासून सुरुवात करण्यात आलीय. मात्र आता दुसऱ्या टप्प्यामध्ये राजकीय नेत्यांना करोनाची लस देण्यात येणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व खासदार, आमदार यांच्याबरोबरच इतर आजार असणाऱ्या राजकीय नेत्यांचे लसीकरण केलं जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे अनेक दिग्गज नेते हे ८० वर्षांहून अधिक वयाचे आहेत. ८० हून अधिक वय असणाऱ्या नेत्यांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, एचडी देवगौडा यांच्याबरोबरच भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे.

सरकारने करोना लसीकरणाची मोहीम टप्प्याटप्प्यांमध्ये राबवली जाणार असल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. करोना लसीकरणाचा दुसरा टप्पा एप्रिल महिन्यामध्ये सुरु होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये ५० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या मंत्र्यांबरोबर नेत्यांना करोनाची लस देण्यात येणार आहे. यात अगदी पंतप्रधानांपासून सर्व मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. सध्याची आकडेवारी पाहिली तर लोकसभेमधील तीनशेहून अधिक नेते ५० पेक्षा जास्त वर्षांचे आहेत. तर राज्यसभेमधील २०० हून अधिक खासदार हे वयाची पन्नाशी ओलांडलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये भारत सरकार तीन कोटी वैद्यकीय कर्मचारी आणि पहिल्या फळीतील करोना योद्ध्यांना करोनाची लस देणार असून दुसरा टप्पा मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल, असं हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

आणखी वाचा- “लस मिळवण्याच्या स्पर्धेत आम्ही टीकणार नाही, आम्हाला…”; ७२ हजार लोकसंख्या असणाऱ्या देशाचं मोदींना पत्र

असा असू शकतो करोना लसीकरणाचा दुसरा टप्पा

प्रत्येक टप्प्यातील करोना लसीकरणासाठी सरकारने विशेष तयारी केल्याचे सांगितले जात आहे. करोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्याही लोकप्रितिनिधिंना करोनाची लस दिली जाणार नाही. करोना लसीकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने यासंदर्भातील माहिती दिली असून त्यांच्या हवाल्यानेच हे वृत्त देण्यात आलं आहे.

नेत्यांच्या सहभाग महत्वाचा

देशामध्ये करोनाची लसीकरण मोहीम सुरु होण्याच्या आधीच या लसीसंदर्भात अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करोना लसीकरणाचे नियोजन करणाऱ्या राष्ट्रीय कृती दलाने देशातील २७ कोटी लोकांना करोनाची लस देण्यासाठी स्थानिक नेत्यांचा सहभाग महत्वाचा असेल असं म्हटलं आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार एखाद्या नेत्यानेच करोनाची लस घेतल्यास या लसीसंदर्भात लोकांमध्ये असणारा भ्रम दूर होऊन ते सुद्धा स्वइच्छेने करोना लसीकरणासाठी पुढे येतील.