पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल हे हॅनोव्हर मेळाव्यात ‘भागीदार राष्ट्र’ म्हणून भारताच्या सहभागाचे संयुक्तरीत्या उद्घाटन करणार असून, रविवारपासून सुरू होणाऱ्या मोदी यांच्या पहिल्याच अधिकृत जर्मनी दौऱ्यात सविस्तर बोलणीही करणार आहेत.
पंतप्रधान मोदी हे रविवारी सायंकाळी हॅनोव्हर येथील मेळाव्याच्या ठिकाणी येतील, तेव्हा चान्सलर मर्केल या त्यांचे स्वागत करतील. यानंतर, भांडवली मालमत्ता आणि तंत्रज्ञानाचा जगातील सर्वात मोठा मेळावा असलेल्या वार्षिक ‘हॅनोव्हर फेअर’च्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतील. या दोन्ही नेत्यांची हॅनोव्हर काँग्रेस केंद्रातील संमेलनात भाषणे होतील.
त्यानंतर मर्केल यांनी पंतप्रधान व भारतीय शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ रात्रभोजनाचे आयोजन केले आहे. भारतातील सुमारे १२० उच्चपदस्थ अधिकारी आणि जर्मनीच्या व्यापार व उद्योग क्षेत्रातील अनेक प्रतिनिधी यावेळी हजर राहण्याची अपेक्षा आहे.
भारतीय कंपन्यांचा हॅनोव्हर मेळाव्यातील हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा सहभाग आहे. यानंतर ‘भागीदार राष्ट्रांसाठी’ आयोजित केलेल्या हॅनोव्हर मेळावा उद्योग परिषदेच्या उद्घाटनातही ते सहभागी होतील. मंगळवारी पंतप्रधान मोदी हे जर्मनीचे परराष्ट्रमंत्री फ्रँक वॉल्टर स्टेनमायर यांच्याशी चर्चा करतील. नंतर ते हॅनोव्हरमध्ये महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करतील.