केवळ तंत्रज्ञानाद्वारे जीवन जगता येणार नाही, त्यासाठी मनुष्यबळाची नितांत गरज आहे आणि ही गरज पूर्ण करण्याची क्षमता भारतामध्येच असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलियातील ऑलफोन्स अरिना स्टेडियमवरील भाषणात व्यक्त केला.
ऑलफोन्स अरिना स्टेडियमवरील कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या तब्बल १८ हजार नागरिकांसमोर मोदींनी आपल्या भाषणातून ऑस्ट्रेलियात दमदार ‘बॅटींग’ केली. ऑस्ट्रेलिया आणि भारतात क्रिकेटशिवाय जगता येत नाही, या दोन्ही देशांना क्रिकेटने जोडल्याचे निरीक्षण मोदींनी यावेळी नोंदविले. तसेच लोकशाही हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांना जोडणारा समान धागा असल्याचेही मोदी म्हणाले. श्रमप्रतिष्ठा हा ऑस्ट्रेलियाकडून शिकण्यासारखा गुण असून भारतामध्ये ‘श्रमेव जयते’ची संकल्पना साकारून परिश्रमाला महत्त्व देण्यास सुरूवात झाली असल्याचे मोदी म्हणाले. विविध क्षेत्रात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्त्व केलेल्या भारतीय नागरिकांचे नरेंद्र मोदींनी कौतुक केले.
भारतात स्वच्छता वाढल्यास पर्यटनात वाढ होईल. त्यामुळे देश स्वच्छ करण्याचं आणि शौचालये उभारण्याचं काम मी हाती घेतलं आहे, त्यामध्ये तुमचं योगदान जरूर द्या, असे आवाहन देखील मोदींनी यावेळी केले. देशासाठी प्राण देणं हे प्रत्येकाच्या नशिबी नसतं पण देशासाठी जगणं प्रत्येकाला शक्य असल्याचे म्हणत मोदींनी ऑस्ट्रेलियातील भारतीयांना भावनिक साद घातली. यावेळी मोदींनी आजीवन व्हिसासाठी भारताकडून महत्त्वपूर्ण पावले उचलली जात असल्याचेही म्हटले. तसेच ऑस्ट्रेलियातून येणाऱया पर्यटकांच्या व्हिसासंदर्भातील अडचणींवरही लवकरच तोडगा शोधण्यात येणार असल्याचे मोदींनी सांगितले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ‘ब्रेट ली’ने मोदींचे ऑलफोन्स स्टेडियमवर स्वागत केले. मोदींचे आगमन होताच संपूर्ण स्टेडियमवर मोदी नामाचा जल्लोष सुरू होता.
मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे-
– भारतात स्वच्छता वाढल्यास पर्यटनात वाढ होईल.
– रेल्वेत शंभर टक्के ‘एफडीआय’ आणण्याचा मानस.
देश स्वच्छ करण्याचं आणि शौचालये उभारण्याचं काम मी हाती घेतलं आहे, त्यामध्ये तुमचं योगदान जरूर द्या.
– श्रम प्रतिष्ठा हा ऑस्ट्रेलियाकडून शिकण्यासारखा गुण
जनधन योजनेच्या यशाचा मोदींकडून उल्लेख.
– ऑस्ट्रेलिया आणि भारतात क्रिकेटशिवाय जगता येत नाही, या दोन्ही देशांना क्रिकेटने जोडले.
– विविध क्षेत्रात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्त्व केलेल्या भारतीय नागरिकांचे नरेंद्र मोदींकडून कौतुक.
– देशासाठी प्राण देणं हे प्रत्येकाच्या नशिबी नसतं पण देशासाठी जगणं प्रत्येकाला शक्य आहे.
– स्वतंत्र भारतात जन्माला आलेली व्यक्ती आणि देशाचा पंतप्रधान याचा मला अभिमान.
– २८ वर्षांनंतर प्रथमच भारताचा पंतप्रधान ऑस्ट्रेलियामध्ये दाखल.
– लोकशाही हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांना जोडणारा समान धागा.
– भारतमातेकडे २५० कोटी भूजा आहेत. त्यातील अर्ध्याहून अधिक भूजा या तरूण आहेत. 
– ऑस्ट्रेलियामधील भारतीयांना ऑस्ट्रेलियाने आपलेसे केले आहे.