पंतप्रधान मोदी यांची ‘आप’वर जोरदार टीका

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये होणारी विधानसभा निवडणूक ही नव्या दशकातील पहिली निवडणूक आहे. भारताच्या विकासाची मोहोर उमटवणारे हे दशक असेल. देशाची प्रगती आज घेतल्या गेलेल्या निर्णयांवर अवलंबून असून एका बाजूला सकारात्मक निर्णय घेणारे केंद्र सरकार आहे, तर दुसऱ्या बाजूला निर्णयांना विरोध करणारे पक्ष आहेत. म्हणूनच दिल्लीला दोष देणारे नव्हे, तर दिशा देणारे सरकार हवे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिल्लीतील ‘आप’ सरकारवर टीका केली.

दिल्ली निवडणूक प्रचारातील मोदींनी  दुसरी सभा घेतली. पश्चिम दिल्लीतील द्वारका भागात घेतलेल्या जाहीर सभेत मोदींनी केंद्राच्या योजना लागू न करण्याच्या ‘आप’च्या निर्णयावर  हल्ला केला. केंद्राच्या योजनांचा लाभ दिल्लीकरांना मिळू न देणाऱ्या सरकारची गरज नाही. ‘सब का साथ सब का विकास’चा अर्थ समजणारे सरकार दिल्लीत स्थापन झाले पाहिजे. पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देणाऱ्या आयुष्मान विमा योजनेपासून वंचित राहणाऱ्या दिल्लीतील गरीब जनतेचा काय दोष आहे, पंतप्रधान आवास योजनेतून घर न मिळू शकणाऱ्या बेघरांचा काय दोष आहे, सामान्यांच्या विकासात अडथळा निर्माण करणारे सरकार दिल्लीकरांना अपेक्षित नाही, असे म्हणत मोदींनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शरसंधान साधले. केंद्राच्या योजना दिल्ली सरकारने लागू केलेल्या नाहीत याबद्दल मोदींनी टीका केली. लोकसभा निवडणुकीत दिल्लीकर मतदारांनी भाजपवर विश्वास ठेवला. त्यामुळेच स्वाभिमानी दिल्लीकर म्हणतात की, देश बदलला आता दिल्लीही बदलू.. हा नारा आणण्यासाठी  भाजपवर विश्वास दाखवा, असे आवाहन मोदींनी केले.

‘बेरोजगारी शिगेला, हा योगायोग की प्रयोग?’

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी- वढेरा यांनी दिल्लीत मंगळवारी संयुक्त सभा घेतली. राहुल यांच्या दोन सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. प्रियंका  यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले. मोदी सभेत रोजगारीबद्दल कधीही बोलत नाहीत. गेल्या पाच वर्षांमध्ये लोक बेरोजगार का झाले, हे मोदींनी सांगावे. बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक असून हा योगायोग आहे की प्रयोग हेही मोदींनी स्पष्ट करावे, अशी टीका प्रियंका यांनी केली. राहुल यांनीदेखील आर्थिक मुद्दय़ावरून केंद्र सरकारला धारेवर धरले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तीन तास अर्थसंकल्पीय भाषण केले; पण त्यांनी एकदाही रोजगार कसे निर्माण होणार हे सांगितले नाही, असे राहुल म्हणाले.