भारतामध्ये सध्या उद्योगांसाठी पुरक वातावरण निर्माण झाले आहे. देशातील या बदलत्या वाऱ्यांची दिशा ओळखा आणि त्याचा फायदा उचला, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनी उद्योजकांना केले. ते शनिवारी बीजिंगमधील भारत आणि चीन उद्योग परिषदेत बोलत होते. यावेळी दोन्ही देशांमध्ये तब्बल २२०० कोटीं डॉलर्सच्या द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. भारतात सध्या उद्योगांसाठी पारदर्शक आणि स्थिर वातावरण निर्माण झाले आहे. चीनी उद्योजकांसाठी ही ऐतिहासिक संधी असून त्यांनी या संधीचा योग्य तो फायदा उचलावा, असे मोदींनी म्हटले. या परिषदेला चीनमधील आघाडीच्या २२ कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये जगातील आघाडीच्या अलिबाबा या उद्योगसमुहाचे अध्यक्ष जॅक मा यांचाही समावेश होता.
आमचे सरकार भारतातील व्यावसायिक वातावरण सुधारण्यासाठी कटिबद्ध आहे. तुम्ही एकदा भारतात व्यवसाय करायचे ठरवले तर, मी तुम्हाला शाश्वती देऊ इच्छितो की, तुमच्यासाठी पुढील सर्व गोष्टी सुकर होतील, असे मोदींनी यावेळी सांगितले. भारत आता नव्या गुंतवणुकीसाठी सज्ज आहे. तुम्ही या बदलत्या वाऱ्यांची दिशा ओळखावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा, असेही मोदींनी म्हटले.
चीन म्हणजे ‘जगाचा कारखाना’ आहे. तर भारत म्हणजे जगाचे ‘बॅक ऑफिस’ आहे. त्यामुळे भविष्यात चीनने हार्डवेअरच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करावे आणि भारत सॉफ्टवेअर आणि सेवाक्षेत्रावर लक्ष केंद्रित करेल, असा प्रस्ताव मोदींनी चीनसमोर ठेवला. नरेंद्र मोदींच्या चीन दौऱ्याचा आज शेवटचा असून दोन्ही देशांतील खासगी गुंतवणुकीबाबत आज महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.