पंतप्रधानांचे आवाहन
राज्यबाह्य़ अतिरेकी शक्तींनी मोठय़ा भूभागावर नियंत्रण मिळविले असून या शक्ती निष्पाप नागरिकांवर अत्याचार करीत आहेत. त्यामुळे रक्तपात आणि हिंसाचार रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे असून सर्व समस्यांवरील तोडगा चर्चेत आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.
‘संवाद – ग्लोबल हिंदू बुद्धिस्ट इनिशिएटिव्ह ऑन कन्फ्लिक्ट अव्हॉयडन्स अ‍ॅण्ड एनव्हायर्नमेण्ट कॉन्शस्नेस’ परिषदेत मोदी बोलत होते. विवेकानंद आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानच्या वतीने तीन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.
मानव, धर्म, समाज यांच्यातील संघर्षांनंतर दुसरा संघर्ष निसर्ग आणि मानव आणि निसर्ग आणि विकास आणि निसर्ग आणि विज्ञान यांच्यातील आहे. सदर संघर्ष टाळण्यासाठी चर्चेची गरज आहे, मात्र केवळ देण्याघेण्यापुरतीच चर्चा मर्यादित नाही, असेही ते म्हणाले.
हिंसाचार, रक्तपात टाळण्यासाठी आपल्याला सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे जग आता बुद्धाच्या शिकवणीची दखल घेऊ लागला आहे यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. ही आशियाई परंपरा आणि मूल्ये यांना एका प्रकारे मान्यताही आहे आणि त्यामुळे विचारसरणीच्या मार्गावरून तत्त्वज्ञानाच्या मार्गाकडे जाण्यासाठी त्याचा वापर करता येणे शक्य आहे.
सर्व प्रकारच्या समस्यांचा तोडगा चर्चेत आहे यावर आपला ठाम विश्वास आहे. यापूर्वी सामथ्र्य हे शक्तिशाली असल्याचे मानले जात होते. मात्र आता सामथ्र्य विचारातून आणि चर्चेतून येते, युद्धाचे विपरीत परिणाम आपण पाहिले आहेत. आपल्या पुढील पिढीला शांततेचे आणि परस्पर सन्मानाचे जीवन लाभावे यासाठी प्रयत्न करणे आपले कर्तव्य आहे. संघर्षमुक्त जगाची पेरणी केली पाहिजे आणि त्यासाठी बुद्धाची शिकवण आणि हिंदुत्ववाद यांचा मोठा सहभाग आहे, असेही मोदी म्हणाले.