पश्चिम बंगालमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्याने भाषण करण्यास नकार दिला. याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित होते. त्यांच्यासमोरच हा सारा प्रकार घडला. यावरून शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून भाजपावर निशाणा साधला. बंगालमध्ये सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेतेमंडळींना फोडून भाजपा निवडणूक लढताना दिसत आहे अशी टीका करण्यात आली. तसेच टागोरांप्रमाणे दाढी वाढलेले पंतप्रधान मोदी असाही उल्लेख करण्यात आला. या मुद्द्यावरून भाजपाचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं.

“ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात खेळलं गेलं ते खूप वाईट होतं. विश्वासघाताचं राजकारण महाराष्ट्रात खेळण्यात आलं. भाजपासोबत युती करून आमच्या मदतीने शिवसेना निवडून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर लावून राज्यात शिवसेनेला मतं मिळाली. पण निकालानंतर ज्या पक्षांविरूद्ध शिवसेना लढली होती, त्याच पक्षांसोबत केवळ सत्तेसाठी एकत्र येऊन त्यांनी विश्वासघात केला. आणि आता याच पक्षाने अशाप्रकारची टीका करून दुसऱ्यावर बोटं दाखवणं हे हास्यास्पद आहे”, असं सडेतोड प्रत्युत्तर केशव उपाध्ये यांनी दिलं.

आणखी वाचा- “टागोरांप्रमाणे दाढी वाढलेले पंतप्रधान मोदीही…,” शिवसेनेची खोचक टीका

नक्की काय लिहिलं आहे ‘सामना’मध्ये…

“प. बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव करायचाच, प. बंगालवर भाजपचा विजयध्वज फडकवायचाच या जिद्दीने भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व बंगालच्या मैदानात उतरले आहे. स्वतः गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नड्डा व इतर अनेक नेत्यांचा बंगालातील राबता वाढला आहे. टागोरांप्रमाणे दाढी वाढलेले पंतप्रधान मोदीही काल कोलकात्यात येऊन गेले. निवडणुकांत कोणीतरी जिंकेल व कोणीतरी हरणारच आहे. हिंदुस्थानी लोकशाही ‘ट्रम्प छाप’ नाही. उत्तर प्रदेश, बिहारप्रमाणेच प. बंगालात भाजपने धार्मिक फाळणी सुरू केली आहे. कौल हा स्वीकारावाच लागतो. पण कौल आपल्या बाजूने वळावा, यासाठी जे अघोरी प्रयोग आपल्या लोकशाहीत केले जातात, ते असह्य ठरतात”, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.