पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिवंगत माजी पंतप्रधान अजट बिहारी वाजपेयी यांचा विक्रम मोडला. मोदी हे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे काँग्रेस पक्षाबाहेरील नेता ठरले आहेत. तर सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणाऱ्यांच्या यादीमध्ये मोदींनी चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. यासंदर्भातील माहिती भाजपानेच दिली आहे. भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकामध्ये भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवला. त्यानंतर २६ मे २०१४ रोजी मोदींनी देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. २०१४ नंतर २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाने २०१४ पेक्षा मोठा विजय मिळवला आणि मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. “आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या इतिहासामध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधान असणारे चौथे पंतप्रधान ठरले आहेत. तसेच ते सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे काँग्रेस बाहेरील पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या सर्व कार्यकाळामध्ये एकूण दोन हजार २६८ दिवस पंतप्रधानपद भूषवलं होतं. आज पंतप्रधान मोदी या बाबतीत त्यांच्या पुढे निघून गेले,” अशं मालवीय यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आयटी सेलच्याच प्रभारी आणि भाजपा महिला मोर्चाच्या नेत्या प्रती गांधी यांनीही ट्विटवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणाऱ्या नेत्यांच्या यादीमध्ये पहिली तिन्ही नावं ही काँग्रेसच्या नेत्यांचीच आहेत. यामध्ये पहिल्या क्रमांकावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आहेत. त्यानंतर या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी इंदिरा गांधी आणि तिसऱ्या स्थानी मनमोहन सिंह यांचा क्रमांक आहे. तर काँग्रेसमध्ये नसलेले पण पंतप्रधान पदाचा कार्यकाळपूर्ण करु न शकलेल्या नेत्यांमध्ये मोरारजी देसाई, चरण सिंग, व्हि. पी. सिंग, चंद्र शेखर, एच. डी. देवेगौडा आणि इंदर कुमार गुजराल यांचा समावेश होतो.