पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वोत्तम नेते असल्याचे सांगत ‘माध्यमवीर’ म्हणून ओळख असलेले दिग्गज उद्योगपती रुपर्ट मरडॉक यांनी शुक्रवारी मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला. मोदींकडे प्रभावी धोरणं आहेत पण, भारतासारख्या जटील देशात त्याची यशस्वी अंमलबजावणी करणं फार मोठं आव्हान आहे, असे मरडॉक यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

अमेरिका दौऱयावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खास बैठकीत दिग्गज उद्योगपतींशी संवाद साधला. देशात रोजगार निर्मिती आणि विकासात प्रसारमाध्यमं आणि मनोरंजन उद्योगक्षेत्राची भूमिका जाणून घेण्यासाठी या क्षेत्रातील बड्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांशी(सीईओ) मोदींनी सविस्तर चर्चा केली. चर्चेदरम्यान सीईओंनी मोदींचे नेतृत्त्व ऊर्जावान आणि गतिशील असल्याची प्रशंसा केली. तसेच भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आशावाद व्यक्त केला. रुपर्ट मरडॉक यांनी बैठक संपल्यानंतर ट्विट करून मोदींच्या नेतृत्त्वाचे कौतुक केले. प्रभावी धोरणं असणारे स्वातंत्र्योत्तर काळातील नरेंद्र मोदी हे सर्वोत्तम नेते असल्याचे मरडॉक म्हणाले.

न्यूयॉर्कच्या वाल्डार्फ ऑस्टेरिया हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत 21st सेंच्युरी फॉक्स, न्यूज क्रॉप, स्टार इंडिया, डिस्कव्हरी कम्युनिकेशन, सोनी एण्टरटेन्मेंट, इंटरपब्लिक ग्रुप ऑफ कंपनी, व्हाइस मीडिया, टाईम वॉर्नर, ए अँड ई नेटवर्क, इएसपीएन या समूहांच्या सीईओंचा समावेश होता.