भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. या दिनाचं औचित्य साधत लसीकरणामध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतात ९ तासात २ कोटी जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे. यावरून देशात प्रत्येक सेंकदाला ५२७ डोस दिले गेल्याचं दिसत आहे. तर एका तासाला १९ लाखांहून अधिक डोस दिले आहेत. यापूर्वी २७ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट आणि ६ सप्टेंबरला एक कोटी डोस दिले होते. त्यानंतर देशात लसीकरणा वेग आणखी वाढवण्याचं आवाहन आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी केलं होतं. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधण्यात आलं. यासाठी संपूर्ण देशात जास्तीत लोकांचं लसीकरण करण्याचं आव्हान केलं होतं.

देशभरात आज लसीकरण अभियान रात्री १२ वाजेपर्यंत चालवलं जाणार आहे. त्यामुळे अडीच कोटीपर्यंत लसीकरण होईल असा अंदाज बांधला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाबाबत ट्वीट करत आनंद व्यक्त केला आहे. “प्रत्येक भारतीयाला आजच्या विक्रमी लसीकरणाच्या संख्येचा अभिमान वाटेल. मी आमचे डॉक्टर, प्रशासक, परिचारिका, आरोग्य सेवा आणि लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेले सर्वांचे आभार मानतो. कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरणाला प्रोत्साहन देत राहूया.”, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत २० दिवस सेवा आणि समर्पण अभियान सुरु केलं आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत हे अभियान असणार आहे. त्याचबरोबर भाजपा मोदी यांचं सार्वजनिक जीवनात दोन दशक पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करणार आहे. यात त्यांचा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ देखील आहे.