निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार असमर्थ ठरले असल्याची टीका विरोधकांकडून होत असतानाच मंगळवारी मोदी यांना त्यांचे बंधू प्रल्हाद यांनीच घरचा अहेर दिला. जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात सरकार अपयशी ठरले असून समस्या सोडविण्याची इच्छाशक्तीच सरकारमध्ये नाही, अशी तोफ प्रल्हाद मोदी यांनी डागली आहे.
अखिल भारतीय रास्त दर दुकान महासंघाच्या वतीने जंतरमंतर येथे आयोजित करण्यात आलेल्या निदर्शनांच्या वेळी प्रल्हाद मोदी यांनी वरील टीका केली. प्रल्हाद मोदी हे या महासंघाचे उपाध्यक्ष आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळावे यासाठी तुम्ही अहोरात्र मेहनत घेतली. मात्र तरीही तुम्हाला जंतरमंतर येथे निदर्शने करण्यासाठी यावे लागत आहे. हे एनडीए सरकारचे अपयश आहे, असे प्रल्हाद मोदी यांनी म्हटले आहे.
आपल्या वक्तव्याकडे भावाने भावाविरोधात केलेले बंड अशा नजरेतून पाहण्यात येऊ नये. नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. परंतु आपण एक व्यावसायिक असून आपल्या भावासमोर समस्या मांडण्यासाठी या मंचावर आलो आहोत, असेही प्रल्हाद मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
भ्रष्टाचाराच्या प्रश्नावरून प्रल्हाद मोदी यांनी सरकारवर टीका केली. जवळपास सर्वच राष्ट्रीय पक्षांनी भ्रष्टाचाराला खतपाणी घातले. आता नरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याचा संदेश देऊन सत्तेवर आले आहे त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरणे भाग पडले आहे, असेही प्रल्हाद मोदी म्हणाले.
जनतेला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला नाही तर उत्तर प्रदेश आणि बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. पक्षाने समस्यांकडे कानाडोळा केल्यास दिल्ली निवडणुकीत भाजपची जी अवस्था झाली तीच अवस्था उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये होईल, असेही प्रल्हाद मोदी म्हणाले.