कर्नाटक विधानसभा निवडणूक १२ मे रोजी रंगणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी कंबर कसून तयारी केली आहे. दोन्ही पक्षांकडून आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका करत मतदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकात सिद्धरामय्या सरकार नाही तर सिधा रुपया सरकार आहे असा आरोप त्यांनी केला. कर्नाटक सरकारची परिस्थिती सध्या अशीच आहे. लाच म्हणून पैसे दिल्याशिवाय इथे कोणतेही काम होत नाही असेही त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कलबुर्गी, बेल्लारी आणि बंगळुरू या ठिकाणी झालेल्या रॅलीत हजर होते. त्या दरम्यानच्या एका भाषणात त्यांनी ही घणाघाती टीका केली आहे.

आम्ही पाकिस्तानच्या कुरापतींना उत्तर देण्यासाठी सर्जिकल स्ट्राइक घडवून आणला. त्यानंतर काँग्रेसने लष्कर प्रमुखांना गुंड म्हटले. देशाच्या लष्कर प्रमुखाबाबत ही भाषा वापरणे काँग्रेसला शोभते का? देशाच्या सैनिकांनी सर्जिकल स्ट्राइक केल्यावर पाकिस्तानने तिथल्या दहशतवाद्यांचे मृतदेह ट्रकमधून नेल्याची बातमी पाकिस्तानच्याच वृत्तपत्रात छापून आली होती. मात्र काँग्रेसमधले अनेक नेते सर्जिकल स्ट्राइक घडवला असेल तर पुरावे द्या असे म्हणू लागले. देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या जवानांनी पाकिस्तानशी दोन हात करताना सोबत कॅमरे घेऊन जाणे काँग्रेसला अपेक्षित होते का? असाही प्रश्न नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला.

बंगळुरु हे देशातले आयटी हब मानले जाते. मात्र कर्नाटक सरकारने हे गुन्हेगारांचे शहर बनवले असाही आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. दादागिरी आणि गुंडगिरीची संस्कृती काँग्रेसला या ठिकाणी राबवायची आहे. इथली परिस्थिती हाताळण्यात आणि गुन्हेगारी कमी करण्यात काँग्रेस सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. राजधानी दिल्लीनंतर बंगळुरु हे असे शहर आहे जिथे गुन्हेगारीचे प्रमाण २८ टक्क्यांनी वाढले आहे असाही आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. कर्नाटकात महिला सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी महिला आणि मुलींवर होणारे अत्याचारही वाढले आहेत असे म्हणत पंतप्रधानांनी सिद्धरामय्यांवर निशाणा साधला.