पंतप्रधान कार्यालयाकडून नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या तपशीलानुसार सध्याच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात खर्चासाठी फक्त ४,७०० रूपये आहेत. या तपशीलानुसार मोदींची एकुण मालमत्ता १.४१ कोटींच्या घरात असून त्यामध्ये मुख्यत्वे त्यांच्या निवासी मालमत्तेचा समावेश आहे. मोदींनी खरेदी केल्यापासून गेल्या १३ वर्षांत या मालमत्तेची किंमत तब्बल २५ पटींनी वाढली आहे. मात्र, इतकी मालमत्ता असूनही मोदींनी खर्चासाठी स्वत:कडे अवघे ४,७०० रूपयेच का ठेवले असावेत, ही आश्चर्याची गोष्ट आहे.
ऑगस्ट २०१४ मध्ये मोदींकडे ३८,७०० रूपयांची रोख रक्कम होती, ती गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत ४,७०० रूपयांपर्यंत खाली आल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या या तपशीलात दिसत आहे. मात्र, याच काळात नरेंद्र मोदी यांची स्थावर आणि जंगम मालमत्तेचा आकडा १,२६,१२,२८८ वरून १,४१, १४, ८९३ वर पोहचला.
नरेंद्र मोदींनी २६ मे २०१५ रोजी देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. या निवडणुकीच्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मोदींच्या नावे कोणतेही वाहन नव्हते. त्यांचे गुजरातमधील एका बँकेत खाते होते. दिल्लीत त्यांच्या नावाचे कोणतेही बँक खाते नव्हते. मोदींच्या नावावर कोणतेही कर्ज नव्हते. याशिवाय, त्यांच्याकडे असलेल्या ४५ ग्रॅम वजनाच्या सोन्याची किंमत गेल्या मार्च अखेरीपर्यंत १.१९ लाख इतकी असल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले होते.
दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर ३० जानेवारी २०१६ पर्यंतच्या मोदींच्या मालमत्तेचे नवीन प्रतिज्ञापत्र जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये मोदींच्या नावे एल अँण्ड टी कंपनीचे वीस हजार रूपयांचे रोखे, ५.४५ लाखांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे आणि १.९९ लाखांची जीवन विमा योजना आहे. या सगळ्याची एकत्रित किंमत ४१.१५ लाख इतकी आहे.
नरेंद्र मोदींच्या नावे असलेल्या जंगम मालमत्तेत त्यांच्या गांधीनगर येथील घरामधील एक चतुर्थांश वाट्याचा समावेश आहे. या जागेचे क्षेत्रफळ ३,५३१.४५ इतके आहे. मोदींनी २००२ मध्ये १,३०,४८८ रूपयांना ही मालमत्ता खरेदी केली होती. या जागेची सध्याची किंमत साधारण एक कोटी इतकी आहे.
मोदींच्या नावे एसबीआय बँकेत ९४,०९३ आणि राजकोट नागरिक सहकारी को-ऑप बँकेत ३०,३४७ रूपये आहेत. याशिवाय, त्यांच्या नावे एसबीआय बँकेत ३०, ७२, ०१७ रूपयांची मुदत ठेव आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या तपशीलात मोदींची पत्नी जशोदाबेन यांच्या मालमत्तेचा उल्लेख ‘माहित नाही’, असा करण्यात आला आहे.