कर्नाटकातील मोठ्या राजकीय पेचानंतर अखेर काँग्रेस-जेडीएसच्या सरकारमध्ये कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाची तर जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीला देशभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करुन कुमारस्वामी आणि परमेश्वर यांचे अभिनंदन केले.


या शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या केंद्रातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन केले. २०१९च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच व्यासपीठावर आलेल्या विरोधकांची मोठी चर्चा होती. या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, बसपा सुप्रीमो मायावती, तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, सीपीएमचे नेते सिताराम येचुरी, जनता दल युनायटेडचे शरद यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव अशा दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील फुलपूर आणि गोरखपूर येथील लोकसभा पोटनिवडणुकीत एकत्र येऊन भाजपाला धोबीपछाड देणाऱे सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपा सुप्रीमो मायावती या पहिल्यांदाच एका व्यसपीठावर दिसून आले.