‘मेक इन इंडिया’ योजनेंतर्गत डिझेल इंजिनमधून इलेक्ट्रिक इंजिनमध्ये रुपांतरीत केलेल्या जगातील पहिल्या रेल्वे इंजिनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकार्पण केले. वाराणसीतील डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स (डीएलडब्ल्यू) या रेल्वेच्या कारखान्याच्या परिसरात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोदींनी दिव्यांग व्यक्तींशी संवाद साधला.


या प्रयोगाद्वारे २,६०० हॉर्सपावरच्या दोन युनिटच्या डिझेल इंजिनचे १०,००० हॉर्सपावरच्या इलेक्ट्रिक इंजिनमध्ये रुपांतरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रेल्वे इंजिन रुपांतरीत करण्याचा हा जगातील पहिलाच प्रयोग आहे. या यशस्वी प्रयोगामुळे रुपांतरीत इंजिन हे १०,००० हॉर्सपावरच्याय ट्वीन इंजिनप्रमाणे काम करणार आहे, डीएलडब्ल्यूचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नितीन मल्होत्रा यांनी ही माहिती दिली.

मल्होत्रा म्हणाले, रिसर्च डिझाईन अॅण्ड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (आरडीएसओ), चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स (सीएलडब्ल्यू) आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) यांच्या अभियंत्यांनी विक्रमी वेळेत ही कामगिरी पार पाडली आहे.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अशा प्रकारे डिझेल इंजिनचे रुपांतर इलेक्ट्रिक इंजिनमध्ये करणे ही केवळ ऐतिहासिक कामगिरी नव्हे तर खर्चातही बचत करणारी मोठी कामगिरीही ठरली आहे.