28 February 2021

News Flash

काही जण कधीच घरी परतले नाहीत, असं म्हणताच पंतप्रधानांचा कंठ आला दाटून

"त्यावेळचा विचार केला तर अंगावर शहारे येतात. उदास वाटू लागतं. पण..."

लसीकरण मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी संबोधित करताना पंतप्रधान मोदी. (छायाचित्रं/एएनआय)

करोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या भारतात अखेर लसीकरणाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरणाच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांनी लसी निर्मितीच्या यशासाठी देशवासीयांचं अभिनंदन केलं. त्याचबरोबर करोना काळात भारतीयांनी अनुभवलेल्या वेदनांनाही फुंकर घातली. करोनामुळे मृत्यू झालेल्या कोविड योद्धे आणि नागरिकांविषयी बोलताना पंतप्रधान मोदी यांचा कंठ दाटून आला.

देशाला संबोधित करताना मोदी म्हणाले, “आज भारत लसीकरण मोहीम सुरू करत आहे. तर यानिमित्तानं मी त्या दिवसांचंही स्मरण करत आहे. करोना संकटाचा तो काळ, जेव्हा प्रत्येकाला वाटत होतं की काहीतरी करू. सामान्यतः आजारपणात पूर्ण कुटुंबचं आजारी व्यक्तीसाठी एकत्र येतं. पण या आजाराने रुग्णालाच एकटं करून टाकलं. अनेक ठिकाणी छोट्या बालकांना आईपासून दूर राहावं लागलं. आई त्रस्त व्हायची. रडायची. पण काही करू शकत नव्हती. मुलाला कुशीत घेऊ शकत नव्हती. वयोवृद्ध पालक रुग्णालयात एकटेच संघर्ष करत होते. मुलं इच्छा असूनही जवळ जाऊ शकत नव्हते. जे आपल्याला सोडून गेले, त्यांना परंपरेनुसार तो निरोपही मिळाला नाही, ज्याचे हकदार होते, असं बोलताना पंतप्रधान मोदींना गहिवरून आलं.

दाटलेल्या कंठानेच त्यांनी पुन्हा बोलायला सुरूवात केली. “त्यावेळचा विचार केला तर अंगावर शहारे येतात. उदास वाटू लागतं. पण संकटाच्या त्याच काळात, निराशेच्या त्या काळात कुणीतरी आशा पेरत होतं. आपल्याला वाचवण्यासाठी आपले प्राण संकटात टाकत होतं. आपले डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, पोलीस यांनी मानवतेसाठी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिलं. कित्येक दिवस घरीही गेले नाही. शेकडो सहकारी असेही आहेत जे पुन्हा घरी परत आलेच नाहीत. त्यांनी एका एका जीवाला वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे आज करोनाचा पहिला डोस आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना देऊन समाज कृतज्ञता व्यक्त करत आहे. मानवाच्या इतिहासात अनेक संकट, महामाऱ्या आल्या. संकट आली. पण, करोनासारख्या संकटाची कुणीही कल्पना केली नव्हती. याचा अनुभव विज्ञानालाही नव्हता अन् समाजालाही,” असं म्हणताना मोदींचे डोळे भरून आले.

दुसऱ्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची माहिती दिली. “पहिल्या टप्प्यात तीन कोटी कोविड योद्ध्यांना लस देण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३० कोटी नागरिकांना करोनाची लस देण्यात येईल. ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना दुसऱ्या टप्प्यात लस दिली जाईल. तुम्ही कल्पना करू शकता की, ३० कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले फक्त तीनच देश आहे. चीन, अमेरिका आणि भारत,” असं मोदी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2021 11:32 am

Web Title: pm modi gets emotional while talking about hardships faced by healthcare workers during pandemic bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 लसीकरणाबद्दल पंतप्रधान मोदींचं नागरिकांना महत्त्वाचं आवाहन; म्हणाले…
2 लसीवर कोविड योद्ध्यांचा पहिला हक्क -पंतप्रधान मोदी
3 “शेतकरी आंदोलनाप्रकरणी तातडीने सुनावणी होऊ शकते, तर मग काश्मीर प्रकरणी का नाही?”
Just Now!
X