पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना ४५ व्या वाढदिवसानिमित्त ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. राहुल गांधी यांनीही मनमोकळेपणाने या शुभेच्छांचा स्वीकार करीत आभार मानले.
शुभेच्छांमध्ये मोदी यांनी राहुल यांच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. राहुल यांच्या कार्यालयाचे नुकतेच ट्विटर खाते उघडण्यात आले आहे. यावर मोदींनी शुभेच्छा दिल्या. तसेच तामिळनाडूतील द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी व स्टॅलीन यांनीही राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
विशेष म्हणजे राहुल गांधींनी याआधीचे वाढदिवस परदेशात साजरे केले होते. या वेळी प्रथमच त्यांनी भारतात वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. हे वर्ष राहुल यांच्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर त्यांच्या नेतृत्वावर पक्षातूनही शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. यामुळे त्यांना पक्षाच्या कामगिरीबरोबरच स्वत:ची प्रतिमाही सुधारावयाची आहे. यामुळेच राहुल यांनी आपला वाढदिवस देशातच साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, त्यांच्या १२, तुघलक रस्त्यावरील निवासस्थानासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी ४५ किलोचा केक कापून व फटाके फोडत वाढदिवस साजरा केला. या वेळी महिला कार्यकर्त्यांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.