चीन आणि पाकिस्तानसोबत युद्धासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारीख निश्चित केली आहे, असा दावा उत्तर प्रदेशचे भाजपा प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये सिंह म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे निश्चित केलं आहे की, पाकिस्तान आणि चीनसोबत युद्ध कधी होईल. नुकतीच त्यांनी एका कार्यक्रमाच्या भूमिपूजन सोहळ्याला हजेरी लावली होती तेव्हा त्यांनी हे विधान केलं आहे.

भाजपा नेत्याने आपल्या दाव्याला अयोध्येत राम मंदिर निर्मितीला प्रारंभ होण्याला आणि जम्मू-काश्मीरच्या विशेष दर्जा संपवल्याशी जोडलं आहे. त्यांनी म्हटलं की, “राम मंदिर आणि कलम ३७० वर घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे निश्चित केलं आहे की, पाकिस्तान आणि चीनसोबत युद्ध कधी होईल. कधी काय होईल यासाठीची तारीखही निश्चित करण्यात आली आहे.

स्वतंत्र सिंह यांनी २३ ऑक्टोबर रोजी हे विधान केलं होतं. याच कार्यक्रमात त्यांनी समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेसच्या नेत्यांची तुलना दहशतवाद्यांसोबत केली होती. याबाबत भाजपाचे खासदार रवींद्र कुशवाहा यांना याबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की, प्रदेशाध्यक्षांनी हे विधान कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी केलं होतं.