पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कन्हैयाच्या रूपाने तोडीस तोड व्यक्ती मिळाला आहे, असे विधान लेखिका नयनतारा सहगल यांनी केले आहे. त्या दिल्लीतील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होत्या. यावेळी सहगल यांनी कन्हैया कुमारने तुरूंगातून सुटल्यानंतर जेएनयू विद्यापीठात केलेल्या भाषणाची आणि त्याने प्रसारमाध्यमांना दिलेल्या समतोल मुलाखतींची प्रशंसा केली. कन्हैयाचे समतोल, समंजस व राष्ट्रवादी विचारांनी भरलेले ते भाषण देशासाठी चैतन्यदायी होते. गेल्या काही दिवसांपासून आमच्यासारखे अनेक लोक नैराश्याच्या गर्तेत सापडले होते. त्यांना त्यामधून बाहेर काढल्याबद्दल कन्हैयाचे आभार मानायला हवेत. कन्हैयाच्या रूपाने मोदींना तोडीस तोड मिळाली आहे, असे यावेळी नयनतारा सहगल यांनी म्हटले.
सध्या इतिहास, शिक्षण आणि संस्कृतीची मोडतोड केली जात आहे. त्यामुळे ‘भारत’ नावाची संकल्पनाच संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक भारतीयाने आक्रमक होऊन या सगळ्याविरोधात आवाज उठवला पाहिजे. त्याबद्दल कोणालाही काहीही स्पष्टीकरण देण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले. नयनतारा सहगल यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केल्यानंतर देशभरात ‘पुरस्कार वापसी’ मोहिमेने जोर धरला होता.