आकाशवाणीवर दर महिन्यात प्रसारित केल्या जाणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या, रविवारी अमली पदार्थाच्या दुष्परिणामांबाबत बोलणार आहेत.
रविवारी सकाळी ११ वाजता प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात माझ्या मनातील विचार लोकांपर्यंत पोहचवण्याची मी वाट पाहत असतो, असे मोदी आज ट्विटरवर म्हणाले. मागील कार्यक्रमात सांगितल्यानुसार, मी अमली पदार्थाच्या दुष्परिणामांबाबत बोलणार आहे. काही लोकांनी मला या विषयाबद्दल लिहिले होते, असे यापूर्वी २ नोव्हेंबर रोजी झालेल्या दुसऱ्या कार्यक्रमात मोदी यांनी सांगितले. त्यांनी नंतर लोकांना या विषयावर त्यांची मते आणि सूचना पाठविण्याचे आवाहन केले होते.
अनेक लोकांनी त्यांच्या कल्पना, मते आणि सूचना माझ्याकडे पाठवल्या, ज्या डोळे उघडणाऱ्या आणि मला हा विषय समजून घेण्यास मदत करणाऱ्या होत्या. या बाबी माझ्यापर्यंत पोहचवल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असे त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून रेडिओवरून मी दर महिन्यात माझ्या विचारांची देशवासीयांसोबत देवाघेवाण करीन, असे पंतप्रधानांनी यापूर्वीच म्हटले आहे.