पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार ; राज्य सरकारसह विकास कामांत सहभागाचे आश्वासन
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे प्रसिद्ध वचन ‘इंसानियत, कश्मीरियत आणि जमहूरीयत’ याचा आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेत भविष्यातही जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी काळात जम्मू-काश्मीरमधील तरुणही भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करतील, असा आशावाद मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केला.
जम्मू-काश्मीरच्या नागरिकांचा अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर प्रचंड विश्वास होता. फार कमी नेत्यांना असा आदर मिळतो. त्यांनी ‘इंसानियत, कश्मीरियत आणि जमहूरीयत’ हे वचन जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी वापरले, असे मोदी म्हणाले. या तत्त्वाच्या आधारे जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
श्री वैष्णोदेवी नारायण सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद हेदेखील जम्मू-काश्मीरमधील अंतर कमी करण्याबाबत कायम विचार करायचे, असेही मोदी यांनी या वेळी सांगितले. नव्या मुख्यमंत्री मेहबूबा या जम्मू-काश्मीरच्या विकासाबाबत प्रचंड उत्साही आहेत. त्यांचे नेतृत्व इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे सांगून मोदींनी मेहबूबा मुफ्ती यांना शुभेच्छा दिल्या.
जम्मू-काश्मीरचा विविध क्षेत्रात विकास करण्याबाबत मेहबूबा कायम चर्चा करतात. तसेच राज्यातील कामांबाबत त्यांच्याकडून नेहमी माहिती मिळते, असेही मोदी यांनी सांगितले. शिक्षणासाठी जम्मू-काश्मीर संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना आकर्षित करत आहे. त्यामुळे ही या राज्याची निश्चितपणे जमेची बाजू ठरेल. आरोग्य आणि आरोग्य सुविधांबाबत देशाचा समग्र दृष्टिकोन आहे. यंदा सतरा वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे भारतात आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे देशातील युवाशक्तीचे जगाला दर्शन होईल, अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली.
दवाखाना आणि आजारपण यांपासून दूर राहण्यासाठी स्वच्छतेला पर्याय नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रत्येक ठिकाणी स्वच्छता राखणे गरजेचे असल्याचेही पंतप्रधान या वेळी म्हणाले.
जम्मू-काश्मीरमधील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘२१व्या शतकात ज्ञानशाखेत भारताचे वर्चस्व’
भारत २१व्या शतकात ज्ञानशाखेत राज्य करेल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ३५ वर्षांखालील भारतातील लाखो तरुण भारताच्या विकासात मोलाचा वाटा उचलत आहेत. श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.

‘काश्मीरच्या हृदयातील दुख मांडण्याची गरज’
जम्मू-काश्मीरच्या हृदयातील दुख मांडण्याची गरज असून ते मांडल्यास येथील तरुणांना प्रेरणा मिळेल, असे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या. या महिन्यात जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर मेहबूबा मुफ्ती पहिल्यांदात सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहिल्या. या वेळी त्यांनी पाकिस्तान, सीरिया, लिबिया या अशांत मुस्लीम राष्ट्रांबाबत मते मांडली. विविधतेने नटलेल्या भारतात राहत असल्याबाबत अभिमान असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.