वस्तू व सेवा कर विधेयकासह अन्य महत्त्वाची विधेयक हिवाळी अधिवेशनात मार्गी लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पाऊल आणखी पुढे टाकत संसदेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना शुक्रवारी संध्याकाळी चहापानासाठी निमंत्रित केले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरळीतपणे पार पडून जीएसटी विधेयक मंजूर केले जाण्यासंदर्भात यावेळी चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.
संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी पंतप्रधानांकडून सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांना निमंत्रण पाठविण्यात आले असल्याच्या माहितीला दुजोरा दिला. ते म्हणाले, संसदेत प्रलंबित असलेल्या विधेयकांवर चर्चा करण्यासाठी मोदींनी या दोन्ही नेत्यांना शुक्रवारी संध्याकाळी चहासाठी निमंत्रित केले आहे.
मोदींच्या निमंत्रणाचा स्वीकार करून हे काँग्रेसचे दोन्ही नेते त्यांना भेटण्यासाठी जाणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, संविधान दिनानिमित्त लोकसभेमध्ये कालपासून सुरू झालेली भारतीय संविधानावरील चर्चा आजही पुढे सुरू राहणार असून, राज्यसभेमध्ये आज या विषयावर चर्चा होणार आहे. नरेंद्र मोदीही आज या चर्चेत सहभागी होण्याची शक्यता आहे.