अमेरिका-आयर्लंड या दोन देशांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी आयर्लंडच्या दिशेने रवाना झाले. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता मोदी डबलिनला पोहचतील, तिकडे ते आयर्लंडचे पंतप्रधान एंडा केनींची भेट घेणार आहेत. तब्बल ६० वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान आयर्लंडला भेट देणार असल्याने या दौऱ्याला महत्त्व आहे. यावेळी दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी २५ तारखेला होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनासाठी न्यूयॉर्क येथे जाणार आहेत. याशिवाय, अमेरिकेत गेल्यानंतर मोदी सिलिकॉन व्हॅलीतील उद्योजकांची भेट घेणार असून ते येथील भारतीय नागरिकांना संबोधितदेखील करणार आहेत. या कार्यक्रमासाठी तब्बल १७ ते २० हजार भारतीय उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. २३ ते २९ सप्टेंबर दरम्यानच्या दौऱयात नरेंद्र मोदी एकूण २० कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. यामध्ये गुगल आणि फेसबुकच्या मुख्यालयाला भेट देण्याबरोबरच अॅपल कंपनीच्या टीम कूक आणि मायक्रोसॉफ्टच्या सत्या नडेला यांच्या भेटीचाही समावेश आहे.