शांघाय सहकार्य परिषदेमध्ये (SCO) सहभागी होण्यासाठी व्हीव्हीआयपी विमानाने रवाना झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे पोहोचले आहेत. पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाण्यासाठी परवानगी असतानाही सुरक्षेच्या कारणास्तव हा मार्ग टाळून पंतप्रधानांचे विमान गुरुवारी दुपारी बिश्केकमध्ये पोहोचले.

बिश्केकमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधानांचे विमानतळावर स्वागत करण्यात आले. यानंतर ते SCO परिषदेला हजेरील लावणार आहेत. दरम्यान, रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन आणि चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग यांच्याशी त्यांची द्विपक्षीय चर्चा होईल.

SCO परिषदेला जाण्यावरुन गेल्या काही दिवसांपासून बराच मोठा खल सुरु होता. पंतप्रधान मोदींचे विमान थेट पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून नेण्यासाठी परराष्ट्र मंत्र्यालयाने पाकिस्तान सरकारकडे परवानगी मागितली होती. कारण, बालाकोट प्रकरणानंतर पाकिस्तानने भारतासाठी त्यांची हवाई हद्द पूर्णपणे बंद केली आहे. SCO परिषदेसाठी भारताने मोदींच्या विमानासाठी मागितलेल्या परवानगीला पाकिस्तानने विशेष बाब म्हणून मंजुरी दिली होती. मात्र, तरीही सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाण्याचा विचार रद्द करुन मोदींचे विमान ओमान, इराण आणि मध्य आशियातील देशांच्या हवाईमार्गे किर्गिझस्तानला पोहोचले.