23 July 2019

News Flash

टपाल जाळ्याद्वारे वित्तीय सेवा!

६५० शाखा आणि ३२५० संपर्क केंद्रांद्वारे नवी बँक कार्यान्वित

६५० शाखा आणि ३२५० संपर्क केंद्रांद्वारे नवी बँक कार्यान्वित

देशातील टपाल जाळ्याला बळकटी देणाऱ्या आणि या टपाल जाळ्याचा वापर करून सर्वसामान्यांच्या दारात वित्तीय सेवा पोहोचवत बचतीला चालना देणाऱ्या ‘इंडियन पोस्ट पेमेन्टस् बँके’चे (आयपीपीबी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उद्घाटन केले.

विशेष म्हणजे या बँकेची स्थापना १७ ऑगस्ट २०१६ रोजीच झाली होती. ३० जानेवारी २०१७ रोजी प्रायोगिक तत्त्वावर या बँकेच्या रायपूर आणि रांची येथील दोन  शाखांचे उद्घाटनही झाले होते. त्यामुळे याआधीच प्रत्यक्षात आलेली ही योजना आता देशाच्या सर्व जिल्ह्य़ात पंतप्रधानांच्या हस्ते शनिवारी कार्यान्वित झाली आहे.

टपाल कार्यालयांचे जाळे आणि जवळपास तीन लाख पोस्टमन आणि ग्रामीण टपाल सेवकांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाच्या दारात बँकिंग सेवा त्याद्वारे पोहोचविण्यात येणार आहे. अर्थात दारपोच सेवेसाठी शुल्क आकारले जाईल आणि जीएसटीही आकारला जाईल, असे या बँकेच्या संकेतस्थळावर नमूद आहे.

आयपीपीबी ही अन्य कोणत्याही बँकेप्रमाणेच आहे, मात्र या बँकेची कार्यकक्षा छोटय़ा प्रमाणावरील आणि कोणतीही पतजोखीम नसलेली आहे. या बँकेत अनामत ठेवी स्वीकारण्यात येणार आहेत, मात्र ही बँक अग्रिम कर्ज अथवा क्रेडिट कार्ड देणार नाही.

दळणवळणमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले की, ६५० शाखा आणि ३२५० संपर्ककेंद्रांद्वारे आयपीपीबीची सेवा देशभर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोणत्याही खात्यामध्ये एक लाख रुपयांहून अधिक रक्कम भरल्यास त्याचे आपोआप टपाल कार्यालय बचत खात्यामध्ये रूपांतर होणार आहे, असे सिन्हा म्हणाले. त्यासाठी टपाल बचत बँकांमधील (पीएसबी) तब्बल १७ कोटी खाती संलग्न करण्याची परवानगीही या नव्या बँकेला देण्यात आली आहे.

कर्ज आणि विमा यासाठी आयपीपीबी पीएनबी, बजाज अलिअन्स लाइफ इन्शुरन्स फॉर थर्ड पार्टीसारख्या आर्थिक सेवांशी जोडण्यात येणार आहे. या बँकेचा मोबाइल अ‍ॅपही उपलब्ध राहील. एकदा ‘केवायसी’ म्हणजे ग्राहकाने आपली ओळख निश्चितीकरणाची प्रक्रिया पार पाडली की हा अ‍ॅप त्याला पूर्णपणे कार्यान्वित करता येईल. तालकटोरा मैदानात या बँकेचे उद्घाटन करताना मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

अर्थकारणाला चालना..

संपूर्ण सरकारी मालकीच्या या बँकेची सेवा ६५० शाखांमध्ये उपलब्ध झाली आहे. मात्र देशातील सर्व एक लाख ५५ हजार टपाल कार्यालयांत या बँकेची सेवा उपलब्ध होण्यास डिसेंबर २०१८पर्यंतचा अवधी लागणार आहे. यातील एक लाख ३० हजार शाखा या ग्रामीण भागांत आहेत.  देशातील टपाल कार्यालयांची ही संख्या देशातील बँक जाळ्याच्या अडीचपट असल्याने ही बँक म्हणजे नागरी आणि ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारी ठरणार आहे.

टपाल बँकेची वैशिष्टय़े..

 • आयपीपीबी १०० टक्के सरकारी आणि टपाल खात्याच्या अखत्यारित स्थापन.
 • एअरटेल आणि पेटीएमनंतर ‘पेमेन्ट बँक’ म्हणून परवाना लाभलेली तिसरी सेवा.
 • तब्बल १०० हून अधिक देयकांचा भरणा आणि आर्थिक व्यवहार पार पाडण्याची सोय.
 • बचत आणि चालू खात्यांची सेवा उपलब्ध.
 • निधी हस्तांतरण, लाभार्थी अनुदान हस्तांतरण, गॅस, दूरध्वनी, वीज आदी देयकांचा भरणा, सेवामूल्यांचा भरणा, एटीएम आणि डेबिट कार्ड, नेटबँकिंग आदी सेवा उपलब्ध.
 • खाते उघडण्यासाठी आधारचा वापर, तर वैधता, व्यवहार आणि पैसे भरण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणेचा वापर.
 • खात्यात किमान ठेवीची अट नाही.
 • कमाल ठेवीची मर्यादा एक लाख रुपयांपर्यंतच.
 • त्यापुढील ठेवी या थेट टपाल कार्यालय बचत खात्यांत जमा होणार.
 • बचत खात्यावर चार टक्के व्याजदर.
 • मायक्रो एटीएम, मोबाइल बँकिंग अ‍ॅप, संदेश आदींद्वारे सेवा.

First Published on September 2, 2018 1:25 am

Web Title: pm modi launches india post payments bank