गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेली केंद्रीय माहिती आयुक्त आणि केंद्रीय दक्षता आयुक्त या दोन पदांवरील नियुक्तीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी त्यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली असल्याची माहिती मिळाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱया या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, अर्थमंत्री अरूण जेटली, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग, कॉंग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहणार आहेत.
या दोन्ही पदांवरील नियुक्तीसंदर्भात याआधी मे महिन्यात पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. मात्र, त्यामध्ये कोणताही निर्णय होऊ शकला नव्हता. राजीव माथूर गेल्यावर्षी ऑगस्ट २०१४ मध्ये निवृत्त झाल्यावर नऊ महिन्यांपासून केंद्रीय माहिती आयुक्त हे पद रिक्त आहे. त्याचबरोबर याच विभागातील तीन माहिती आयुक्तांची पदेही रिक्त आहेत.
प्रदीप कुमार यांचा कार्यकाळ संपल्यावर गेल्यावर्षी सप्टेंबरपासून केंद्रीय दक्षता आयुक्त हे पद रिक्त आहे. ही दोन्ही पदे अनेक महिने रिक्त असल्यामुळे विरोधकांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली होती.