‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एखादी शक्य गोष्टी अशक्य करुन दाखवणारा नेते आहेत,’ असे वक्तव्य केंद्रीय राज्य मंत्री नित्यानंद राय यांनी केले आहे. भोपाळमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये राय यांनी मोदींची स्तुती करताना अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवणारे ऐवजी शक्य गोष्ट अशक्य करुन दाखवणारे पंतप्रधान असा उल्लेख केला.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाची उद्देश साध्य करण्यासाठी खूप काम करत आहेत. या उद्देशपुर्तीच्या माध्यमातून मोठे यश मिळाले आहे. संभव को असंभव करणारी व्यक्ती म्हणजे मोदी,’ असं वक्तव्य राय यांनी केले आहे. मध्य प्रदेशच्या भाजपा मुख्यालयामध्ये पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच सारवासारव केली. ‘मोदींचे निर्णय वेगळे आणि अतुलनिय असतात असं मला म्हणायचं होतं,’ असं स्पष्टीकरण राय यांनी दिले.

मात्र राय यांच्या या वक्तव्यावरुन राज्यातील सत्ताधारी पक्ष असणाऱ्या काँगेसने भाजपाला टोमणा लगावला आहे. ‘अखेर सत्य बाहेर आलेच. केंद्रीय मंत्री असणाऱ्या राय यांनी सत्य मान्य केले,’ असा टोला काँग्रेसचे राज्यातील प्रवक्ते नरेंद्र सालुजा यांनी लगावला आहे.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राय यांनी राज्यात सत्तेत असणाऱ्या काँग्रेस सरकारने नवा वाहन कायदा लागू न केल्याच्या मुद्द्यावरुन टीका केली. ‘राज्य सरकारने नवीन वाहन कायदा लागू करायला हवा. देशभरात होणार गंभीर अपघात टाळण्यासाठी सर्व पक्षांनी संसदेमध्ये हा कायदा एकमताने संमत केला आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर वाहतूक नियम मोडणाऱ्यांची संख्या कमी झाली असून हा नागरिकांच्या सुरक्षेसाठी लागू करण्यात आला आहे,’ असं राय यांनी सांगितले.

कलम ३७० आणि ३५ (अ) रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचेही राय यांनी समर्थन केले. ‘जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० आणि ३५ (अ) मुळे दहशतवाद फोफावला होता. आता हे कलम रद्द केल्याने राज्यातील दहशतवाद संपुष्टात येईल. देशवासियांच्या अखंड भारतच्या स्वप्न लक्षात घेऊऩ हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला जगभरातून पाठिंबा मिळाला आहे,’ असं राय यांनी सांगितले. हे कलम रद्द झाल्याने जम्मू काश्मीरमधील जनतेलाही आरक्षण आणि इतर सेवांचा फायदा मिळाले असा विश्वास राय यांनी व्यक्त केला. ‘जम्मू काश्मीरला देण्यात येणाऱ्या निधीचा फायदा आतापर्यंत केवळ तीन कुटुंबांना होत होता. आता तो सर्व सामान्यांनाही होईल,’ असा टोलाही राय यांनी लगावला.

पत्रकारांशी संवाद साधताना राय यांनी आर्थिक मंदीसंदर्भातही मत व्यक्त केले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने ५ ट्रॅलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी निर्णय घेतले जात आहेत. पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे,’ असं राय म्हणाले.