अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये आज राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्येत सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी काही भाष्य करणार का याकडे सर्व देशाचे लक्ष लागलं आहे. असं असतानाच आता भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान मोदींनी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये मंचावरुनच राम सेतूला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची घोषणा करावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भातील ट्विट स्वामी यांनी केलं आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज अयोध्येत भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. असं असलं तरी या सोहळ्याचा उत्साह सोशल नेटवर्किंगवरही दिसून येत आहे. ट्विटवरील सर्वच्या सर्व टॉप ११ ट्रेण्ड हे अयोध्या राम मंदिरासंदर्भातील आहे. अनेक नेत्यांनी आणि मान्यवरांनीही यासंदर्भातील ट्विट केले आहेत.  त्यामध्ये स्वामी यांचाही समावेश असून त्यांनी मोदींनी राम सेतूसंदर्भात घोषणा करावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

“आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येमधील मंचावरुन राम सेतू हे राष्ट्रीय स्मारक असल्याची घोषणा करावी. हा सेतू स्थळे व अवशेष अधिनियमाअंतर्ग येणाऱ्या सर्व नियम आणि अटींची पूर्तता करतो. तसेच सर्वोच्च न्यायलायामध्ये मी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भातील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने २०१५ साली सादर केलेल्या कागदपत्रांमध्येही असं नमूद करण्यात आलं होतं. यासंदर्भातील संस्कृती मंत्रलयाने दिलेली फाइल पंतप्रधानांच्या टेबलवर आहे,” असं स्वामी यांनी म्हटलं आहे.

रामसेतू मानवनिर्मित होता की नैसर्गिक याचा शोध घेण्यासंदर्भात वारंवार वेगवेगळ्या संस्था आणि व्यक्तींकडून मागणी केली जाते. भारतीय पुराणशास्त्रानुसार रामसेतू हा भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान असून तो रामाच्या वानरसेनेने श्रीलंकेत जाण्यासाठी बांधला होता.